आयसोलेशन वॉर्डमध्ये सात नवीन रुग्ण दाखल : कोरोना तपासणीसाठी 22 नमुने पाठविले
- कोरोना तपासणीचे 37 नमुने प्रलंबित
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात महत्वाच्या कामांना परवानगी देण्याबरोबरच मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांनाही परवानगी देण्यात येत आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे सूचना देण्यात आले आहेत. तसेच या सूचनांचे काटेकोर पालन करीत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर जिल्हय़ातून आणखी 22 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एकूण 37 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी नवीन सात रुग्ण दाखल करण्यात आले असून एकूण 48 रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली.
सध्या जिल्हय़ामध्ये संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथीलता देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू राहणार आहे. तसेच भाजीपाल्याची दुकाने, किराणा मालाची दुकाने सुरू राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाने पावसाळय़ापूर्वी पूर्ण करणे गरजेच्या असलेल्या कामांना परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, नागरिकांशी कामगारांची थेट संपर्क येणार नाही, याची दक्षता घेणे अशा स्वरुपाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून घेण्यात येत आहे. त्यानंतरच कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्यामध्ये पूल, रस्ते, साकव यासह सरकारी कार्यालये यांच्या कामांचा समावेश आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासही संचारबंदी व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देऊनच काम सुरू करण्यास परवानगी असणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या वाढली
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये नवीन सात रुग्ण दाखल करण्यात आले असून एकूण 48 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्णांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारी पाठविण्यात आलेले 22 नमुने आणि या अगोदर पाठविण्यात आलेले 15 नमुने असे एकूण 37 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. संस्थात्मक विलगीकरणामध्येही 10 रुग्णांची वाढ झाली असून एकूण 82 रुग्ण संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. तसेच होमक्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांचीही संख्या वाढली असून नव्याने 11 व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात येऊन एकूण 410 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत जिल्हय़ात 197 नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून एकमेव पॉझिटीव्ह रुग्ण वगळता सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्य विभागामार्फत 2694 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
निवारा केंद्रातील 227 जणांची तपासणी
लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेमार्फत खालासेमिआचे 10 रुग्ण, डायलेसीसचे 35 रुग्ण आणि केमो थेरपीचा एक रुग्ण यांना सेवा देण्यात येत आहे. जिल्हय़ातील निवारा केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या 227 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे.
जिल्हय़ात सद्यस्थितीत 11 मजूर, बेघर व कामगार कॅम्प असून त्याठिकाणी सध्या 222 जण वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासासह जेवण, चहा व नाष्टय़ाची व्यवस्था करण्यात आली आहे.
घरीच अलगीकरण 0410
संस्थात्मक अलगीकरण 0082
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0197
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0160
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0159
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0037
विलगीकरण कक्षात दाखल 0048
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शुक्रवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2694









