वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
डिजिटल पेमेंट कंपनी म्हणून ओळख असणाऱया पेटीएम कंपनी कर्मचाऱयांना कोरोना संकटाच्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये कंपनीकडून 250 कोटी रुपयाचे समभाग दिले जाणार आहेत. ही प्रक्रिया आगामी तीन चार महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या दिलासा देण्याच्या निर्णयासोबत कंपनीत नवीन 500 कर्मचारी भरती करून घेतले जाणार आहेत.
पेटीएमने याप्रसंगी ईएसओपीमध्ये एकूण किती कर्मचारी असणार आहेत यासंबंधीचे स्पष्टीकरण दिलेले नाही. कंपनीकडून या संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी याबाबत खुलासा करेल, अशी अपेक्षा आहे. मागील ऑक्टोबरमध्ये पेटीएमने सध्या कार्यरत असणाऱया आणि काही माजी कर्मचाऱयांना ईएसओपीच्या माध्यमातून जवळपास 300 कोटी रुपयांचे समभाग विकण्याच्या पर्यायी संकल्पनेला हिरवा कंदील दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱयांचे वर्तन महत्त्वाचे
पेटीएमचे सीचआरओ रोहित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱयांची पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे. यातील कार्यरत असणाऱया कर्मचाऱयाची कामाची पद्धत त्याचे कंपनीतील एकूण योगदान याचा येथे विचार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. परंतु आजही ज्याचे वर्तन समाधानकारक नाही अशा कर्मचाऱयांना सुधारणा करण्यास जादाचे दोन महिने देण्यात येणार असल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.









