प्रकाश गांधी/चिपळूण :
अमेरिकेत 10 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. पहिल्यांदा शाळा, कॉलेजेस आणि मग टप्प्याटप्प्याने सगळ्याच क्षेत्रावर ते जाणवू लागलं. इथल्या शासनाच्या मते ही स्वयंशिस्त आहे. ती प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने पाळायला हवी. पण अमेरिकनांच्या मोकाट वर्तनामुळे या मात्तबर राष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अमेरिका सध्या प्रथम क्रमांकावर आहे. चिपळूणस्थित माझे मित्र जगन्नाथ पाडावे यांचे अमेरिकेत असलेले इंजिनिअर मुलगे शैलेश व तुषार यांच्याशी केलेल्या गप्पांमधुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यातील फरकाच्या काही बाबी सहज समोर आल्या.
शैलेश पत्नी स्नेहलसमवेत सॅन ओझे, कॅलिफोर्निया येथे राहतात. स्नेहलचे मास्टर्स इन स्टॅटिस्टिक्सचे शिक्षण स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे. शैलेशचे ऑफिस सॅन प्रँसिस्कोमध्ये असले तरी सध्या वर्क फ्रॉम होम सुरु आहे.हा भाग इंटरनेट बिझनेस कंपन्यांशी संबंधीत आहे. एका अर्थी फारच सोयीने घरातुन ऑफिस काम होतंय. शाळा कॉलेजेसचा अभ्यास इंटरनेटवरून होतोय. स्नेहलचे क्लासेसही इंटरनेटवरून चालतात. एकूणच कामात गुंतवून घेतलेल्यांना उसंत नाहीये. बाहेर न पडताही जॉब करता येतोय, काम करता येतंय. दुसरा मुलगा तुषारसुद्धा इंजिनिअर असून फारमिंग्टन, मिशीगन येथे वास्तव्यास आहेत. या भागातही लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम सुरु आहे.
कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढताहेत…
सॅन ओझेमध्ये 40 ते 70 वयोगटातील कोरोना बाधितांची संख्या जास्त असून मृतांमध्ये पुरुषांचा दर 65 टक्के आहे. फॉरमिंग्टनमध्ये 55 ते 70 वयोगटातील नागरिकांना कोरोनाने गाठलंय. येथेही मृतांची आकडेवारी पुरुषांचीच जास्त आहे. न्यूयॉर्क शहरात कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. अर्थात या शहराची लोकसंख्येची घनताही जास्त असल्याने हा आकडा मोठा आहे. अमेरिकेत वास्तव्य करीत असलेले भारतीय लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करतात.
कायद्याचा धाक नसल्याने सारेच मोकाट
सर्व व्यवसाय बंद असले वॉलमार्ट, कॉस्टको, ऍमेझॉन या यंत्रणा सुरु आहेत. याद्वारे वस्तू घरपोच करून संपर्क कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्वच वस्तूंची ऑन-लाईन खरेदी असल्याने पुरवठादारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अत्यावश्यक वस्तुंसाठी मोठमोठय़ा मॉलबाहेर गर्दी आणि लॉकडाऊनचा फज्जा असं चित्रही दिसतंय. लॉकडाऊन असुनही रस्त्यावर गाडया, बसेस व ट्रेन्सही सुरू आहेत. जास्त लोकसंख्येच्या भागात सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुट्टी समजून उपभोग घेणं सुरू आहे. कायद्याचा धाक नसल्याने सगळं मोकाट भासतंय. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेतला कोरोनाचा विळखा घट्ट होतोय.
भारताला प्रत्येक जीवाची काळजी
भारतामध्ये अमेरिकेच्या तुलनेत उशिराने लॉकडाऊन प्रणाली राबवली असली तरी प्रशासनाने उचललेली पावले, जागृत आरोग्य विभाग, सतर्क पोलिस यंत्रणा यांच्या योगदानाला भारतवासियांनी दिलेला प्रतिसाद फारच मोलाचा आहे. अमेरिकेतील यंत्रणेने नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जनतेवर सोपवली आहे. भारतात मात्र प्रत्येक जीवाची काळजी घेण्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदारीने, बांधिलकीने काम करताहेत.
अमेरिकास्थित भारतीयांचे आवाहन
सर्वात मोठय़ा लोकशाहीचा भारत सुखरुप रहावा यासाठी अमेरिकास्थित असंख्य भारतभूच्या लेकरांच्या वतीने शैलेश, स्नेहल आणि तुषार आपल्या बांधवांना कळकळीची विनंती करीत आहेत की, देशवासियांची काळजी घेणारे प्रशासन, स्वत:च्या कुटुंब कबिल्याचाही विचार न करता राबणारी आरोग्य यंत्रणा, दुनियेचा वाईटपणा घेणारे पोलिस बांधव, मदतीचे असंख्य हात या सर्वांचे प्रयत्न, त्यांचे योगदान बहुमोल आहे. ते वाया जाऊ देऊ नका ! या लढय़ात त्यांना नियम पाळून सहकार्य करा! रहा घरात, करा कोरोनावर मात !









