सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असो. चे निवेदन : मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 50 हजाराची मदत
वार्ताहर / कुडाळ:
20 एप्रिलपासून सुरू होणाऱया नवीन नियमावलींतर्गत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी. शासन आदेश व सूचनांचे काटेकोर पालन करून सेवा दिली जाईल, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हय़ातील 40 इलेक्ट्रॉनिक्स शॉपीधारकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 हजार रु. ची मदत सुपुर्द करण्यात आली.
असोसिएशनचे निवेदन तसेच शासनाला आर्थिक सहाय्य निधीचा धनादेश असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजन राणे यांच्याकडून उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारला. असोसिएशनचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुजित पारकर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी आदी गृहोपयोगी वस्तूंची विक्री व दुरुस्ती करणारी अंदाजे 40 दुकाने आहेत. या दुकानांमधून अंदाजे 200 ते 250 कामगार तसेच सर्व्हिस मेकॅनिक काम करतात. या व्यवसायावर वाहनधारकही अवलंबून आहेत. सध्या वाढलेल्या तापमानामध्ये एसी, रेफ्रिजरेटर, कुलर, डीप फ्रीज, मिल्क कुलर आदींचा वापर अत्यंत गरजेचा आहे. नाशिवंत फळे, भाजीपाला यांचा साठा करून ठेवण्यास मदत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत बाहय़जगातील माहितीसाठी तसेच घरबसल्या मनोरंजनासाठी टीव्ही माध्यमाचीही तेवढीच आवश्यकता आहे. दुकानातील कर्मचारी, सर्व्हिस मेकॅनिक व येणारे ग्राहक यांच्यामध्ये अंतर ठेवले जाईल. सॅनिटायझर, मास्कचा वापर करून सेवा देऊ. आपल्या अधिकारात जिल्हय़ातील इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.









