वार्ताहर / देवगड:
देवगड तालुका भाजपच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून मोफत ‘कमळ थाळी’चे आयोजन रविवारी येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले. सुमारे शंभर लोकांच्या जेवणाची व्यवस्था दररोज करण्यात आली आहे.
‘कमळ थाळी’ शुभारंभप्रसंगी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, सभापती सुनील पारकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, प्रियांका साळसकर, संदीप साटम, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, योगेश पाटकर, यश रानडे, लीना पारकर आदी उपस्थित होते. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी आमदार राणे व भाजपने हा उपक्रम देवगडमध्येही सुरू केला आहे. या ‘कमळ थाळी’मध्ये दोन मूद भात, दोन चपात्या, भाजी, वरण, आमटी असे परिपूर्ण जेवण मोफत देण्यात येत आहे. दरदिवशी 100 जणांना दुपारी 12 ते 2 यावेळेत हे जेवण दिले जाणार आहे. दोन बचतगटांमार्फत जेवण बनविण्यात येणार असून हा उपक्रम 3 मेपर्यंत सुरू राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळूनच हा उपक्रम राबविण्यात येत आहे.









