प्रतिनिधी / आटपाडी
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाची चैत्र यात्रेचा मुख्य सासनकाठी व पालखी सोहळा रविवारी फक्त धार्मिक विधीने संपन्न झाला. गुलाल, खोबरे, सासनकाठ्या शिवाय इतिहासातील पहिलीच वेळ सिद्धनाथ यात्रा रद्द झाली.
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले होते तर नाथ देवस्थान ट्रस्टने यात्रा रद्द केल्याचे जाहीर केले होते. दिनांक 15 रोजी अष्टमी दिवशी श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळ्याचा विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर भक्तगणांना उत्सुकता असते ती सासनकाठी व पालखी सोहळ्याची. प्रतिवर्षी सासनकाठी व पालखी सोहळ्यासाठी दोन लाखाहून जास्त भाविकांची हजेरी असते या दिवशी मंदिरातील नित्योपचार झाल्यानंतर दुपारी पारंपारिक वाद्यांच्या गजरात सेवेकरी, मानकरी यांच्या लवाजम्यासह धुपारती व पालखी मुख्य पेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान करते, त्यापूर्वी मानाच्या सासनकाठ्या नाचवल्या जातात. त्यावर शेकडो पोती गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते धुपारती व पालखी जोगेश्वरीमंदिरात पोहोचताच सासनकाठ्या पालखीला टेकवून मानवंदना दिली जाते .त्यानंतर पालखी परतीचा प्रवास सुरू होतो.
गुलाल खोबऱ्याची उधळणीमुळे संपूर्ण नाथनगरी खरसुंडी गुलाबी रंगात न्हाऊन निघते. या सोहळ्यासाठी उपस्थित राहून गुलाल खोबऱ्याची उधळण करून मन तृप्त करण्याची इच्छा असणारे भाविक वर्षभर या सोहळ्याची वाट पाहत असतात .मात्र यात्रा रद्द झाल्याने भाविकांना येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते .खर सुंडीत प्रवेशनाऱ्य सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. परिणामी भाविकांच्या अनुपस्थितीत, गुलाल खोबऱ्याच्या उधळनिशिवाय, चांगभलं’च्या जयघोषा विना ,फक्त धार्मिक विधी पार पडले .यावेळी मोजक्या लोकांची उपस्थिती होती .उपस्थितांना यावेळी पूर्वीच्या सोहळ्याची व उत्साहाचे आठवण येत होती,तर काहीजणांच्या डोळ्यात अश्रू ही तरळले .यात्रेतील भाविकांच्या गर्दीची सवय असणाऱ्या ग्रामस्थांना एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती.
दरम्यान यात्रा रद्द झाल्याने यात्रेनिमित्त भरनारा खिलार जनावरांचाचा बाजारही रद्द झाला, परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली. यात्रा रद्द झाल्याने जनावरांचा बाजार ,गुलाल-खोबरे, किराणा व्यवसाय ,हॉटेल व्यावसायिक, खेळणे विक्रेते तसेच छोटे-मोठे विक्रेते या सर्वांची पाच कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली.