ऑनलाईन टीम / आग्रा :
संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यातच आता आग्र्यामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका भाजीवाल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.
कारण आग्र्यातील फ्रिंगज भागातील एका भाजी विक्रेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या परिसरातील जवळपास 2000 पेक्षा अधिक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहितीनुसार, केजीएमयु रुग्णालयातून आलेल्या चाचणीत चोवीस रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये या भाजीविक्रेत्या चा देखील समावेश होता. हा भाजीविक्रेता लॉक डाऊन च्या काळात भाजी विक्री करत होता.
पाच दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची टेस्ट केली असता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या नंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्याचे काम सुरू आहे.