प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने सरकराने तयारी चालविली असून 20 एप्रिलपासून उद्योग सुरू करण्यात येतील. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्याबाबत बैठकही घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर उद्योजकांना सर्व नियम पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यासंदर्भात उद्योग खात्याचे संचालक तसेच सचिव, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रधान सचिव तसेच संबंधित अधिकारी यांची काल शुक्रवारी बैठक झाली.
सर्व नियमांचे पालन करुन कामकाज करावे
औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उद्योग सुरू करण्याची मान्यता देतील. मान्यतेसाठी जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकांऱयांच्या मान्यतेची गरज असणार नाही. मान्यता घेऊन उद्योजकांनी उद्योग सुरू करावे मात्र परराज्यातील कामगारांना गोव्यात आणता येणार नाही. त्यांचबरोबर सामाजिक अंतर ठेवून काम करावे लागेल. सर्व नियमांचे पालन करूनच उद्योजकांना कामकाज हाताळावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
घर दुरुस्तीसाठी पंचायत, पालिकांकडून परवानगी
घरदुरुस्ती बाबतचे अनेक विषय समोर येत आहेत. ज्यांना घरदुरुस्ती किंवा अन्य दुरुस्तीची कामे करायची आहेत, त्यांनी स्थानिक पंचायत किंवा नगरपालिकेकडून त्यासाठी मान्यता घ्यावी. पंचायत सचिव किंवा नगरपालिका मुध्याधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी व परवानगीचा हाच दाखला साहित्य वाहतुकीसाठी वापरावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मात्र दुरुस्ती काम करताना सामाजिक अंतर ठेवावे. खडी, रेती व अन्य साहित्याच्या उपलब्धीसाठी अधिकाऱयांनी दिलेला परवाना वापरला जावा असेही ते म्हणाले.
सरकारी कार्यालयांमध्ये थर्मल गन देणार
राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी थर्मल गन दिले जाईल. त्याचबरोबर औद्योगिक आस्थापनांमध्येही थर्मल गन उपलब्ध करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार थर्मल गन सरकारने खरेदी केले आहेत. ही गन सर्व खात्यांना देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सोमवारपासून नियम मोडणाऱयांना ठोठावणार दंड
सोमवार 20 एप्रिलनंतर सार्वजनिक स्थळी फिरणाऱयांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणायांना दंड ठोठावला जाणार आहे. त्यांचबरोबर पान, तंबाखू खाऊन थुंकणाऱयांवरही कारवाई केली जाणार आहे. कमी दरात मास्क उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर घरी मास्क तयार करूनही वापरणे शक्य आहे. सेनिटायझरची निर्मितीही मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱयावरही कारवाई केली जाणार आहे. तसेच चार पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यासही कारवाई केली जाणार आहे. बाहेरून येणाऱया वाहन चालकांची कडक तपासणी केली जाईल. वाहनचालक, सोबत असणारी व्यक्ती यांची नोंद ठेवली जात आहे. कुठे थांबणार याचीही चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
……………………………………………………………………………………………………………..
नागरी पुरवठय़ा अंतर्गत सुरळीत धान्य कोटा उपलब्ध केला जात आहे. मजूर शिबिरामध्ये अधिकारी लक्ष देत आहेत. त्याचबरोबर पावसाळी पूर्व कामेही सुरू केली आहेत. यंदा बाहेरील राज्यातून मजूर न आणता शेतीची कामे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
191 सरपंचांशी ऑडीओ व्हिज्युअल चर्चा
राज्यातील 191 सरपंचांशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑडीओ व्हिज्युअलद्वारे चर्चा केली आहे. कोरोना संदर्भात काळजी घेण्याबाबत चर्चा झाली. ग्रामीण पातळीवर काम कसे चालत आहे, याचा आढावा घेण्यात आला. पंचायतींना 25 हजार रुपये खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे. ज्या पंचायतींना जास्त खर्च करणे शक्य आहे त्यांनी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करावे. 165 सरपंचांनी तब्बल 1 तास आपल्यासोबत चर्चा केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण नाही
राज्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. कोरोनाचा संशय असलेल्या 60 रुग्णांची नमुना चाचणी केली. या सर्व चाचण्या नकारात्मक आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बाहेरील राज्यातून कुणी येऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. कुणी आल्यास त्याची माहिती पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी. बाहेरून कुणी व्यक्ती आल्याची माहिती मिळल्यास त्याला थेट विलगीकरण विभागात ठेवले जाईल.
खलाशांचा विषय अंतिम टप्प्यात
खलाशांचा विषय सध्या अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय जहाज उद्योग मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला आहे. त्याचबरोबर गोमंतकीय खलाशांना गोव्यात आणण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. 7 हजार खलाशांची माहिती सरकारपाशी आहे. त्यांना गोव्यात आणल्यानंतर विलगीकरण विभागात ठेवायची व्यवस्थाही केली जाईल. त्यांना टप्प्याटप्प्याने गोव्यात आणले जाईल, असेही ते म्हणाले.
लईराईच्या धोंडगणांनी एकत्र राहू नये
शिरगाव येथील देवी लईराईची जत्रा रद्द केली आहे. त्याचबरोबर लईराईच्या धोंडगणांनी एकत्र राहून उपवास करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. कर्नाटक, महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.









