प्रतिनिधी / राय
गोवा पोलीस खात्यातही कवयित्री आहेत आणि या कवयित्रीचा सध्या कोव्हीड-19 संबंधी जनजागृती करण्यासाठी खाते वापर करीत आहे. यामागील शुद्ध हेतु असा की जनतेने या असाध्य रोगासंबंधी काळजी घेताना घराबाहेर पडता कामा नये आणि या महाभयंकर रोगाला स्वतःच्या घरात आणता कामा नये.
मंगळवारी सायंकाळी सांतेमळ राय, लोटली, कुडतरी तसेच दवर्ली आणि सांतेमळ बाजारात पोलीस वाहनांचा एक ताफा आला. एका मोठय़ा प्रकरणात धाड घालण्यासाठी पोलिसांचा फैजफाटा यावा त्याप्रकारचे हे स्वरुप सुरुवातीला दिसत होते.
काही क्षणात या पोलीस वाहनातून पोलीस कर्मचारी उतरतात. त्यात पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, तसेच सागर एकोस्कर, कपील नायकसह तब्बल सात-आठ निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी. काही क्षण कोणाला काहीही कळत नसते. काय होणार याचीही कल्पना नसते.
इतक्यात एक पोलीस कर्मचारी एका पोलीस वाहनातून एका बॉक्स बाहेर काढतो. कुतूहलाने पाहणाऱया जनतेला नंतर तो एक स्पिकर असल्याचे कळते. दुसराही स्पिकर काढण्यात येतो. पोलीस थोडी कुजबूज करतात आणि ते आयोजन करतात आणि नंतर स्पिकरवरुन आवाज येतो. हा आवाज असतो मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सॅराफिन डायस यांचा.
अत्यंत हृदयापासून ते बोलत असतात. ते सुत्रनिवेदकाची भूमिका करीत असतानाच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे गद्यातून सांगत असतात.
जनता रसिक असते याची जाणीव या पोलीस खात्याला असते आणि म्हणून तियात्रातून अनेक रसिकांची मने रिझवलेल्या आणि अनेकांच्या पसंतीला आलेले पोलीस खात्यातील उपअधज्ञाक सॅमी तावारीस येतात आणि आणि कोव्हीड-19 संबंधी घ्यावयाची काळजी गाण्यातून सांगतात. लांबून ऐकणारे प्रेक्षक त्यांना टाळय़ांची दाद देतात आणि या कार्यक्रमाचा उच्चांक होतो तो एका दमदार महिला पोलिसाच्या प्रवेशाने.
म्हजे भयणी …. म्हज्या भावा
हा कार्यक्रम राय लोटली यासारख्या सासष्टीतील एका दुर्गम भागात झालेला असला तरी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात काम करणाऱया एका महिला पोलीस शिपायाची पोलीस खात्याने दखल घेतलेली असते. तिचे नाव भक्ती देवीदास. काव्यावर भक्ती असलेल्या या भक्तीने कोव्हीड-19 संबंधी कोणती काळजी घ्यावी हे पद्यातून सांगताना म्हजे भयणी।़।़।़… म्हज्या भावा।़।़।़ अशा आर्त स्वरात विनंती करीत प्रेक्षकांचे हृदय हेलावून टाकले. तिचे भावपूर्ण आणि जनतेच्या रक्षणासाठी असलेले हे गीत संपल्यानंतर सुरक्षित अंतर ठेऊन रस्त्यावर थांबलेल्या लोकांनी टाळय़ा वाजवून तिला दाद दिली. पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांचाही त्यात समावेश होता.
संगीत घेऊन आले पोलीस
यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स लॉरेन्स उपस्थित होते. ते म्हणाले, एरवी पोलीस दांडा घेऊन येतात. आज त्यांनी तुमच्यासाठी संगीत आणलेले आहे. जनतेने पोलिसांनी सांगितलेल्या काही पथ्यांचे पालन स्वतःच्या रक्षणासाठी आणखी किमान 15 दिवस तरी करावे.
दक्षिण गोव्यात आजपर्यंत एकही कोरोना केस नाही. अमेरिका, इटली यासारख्या प्रगत देशात हजारोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत. ज्या कोणाला 6 फूट जमिनीखाली जाण्याची इच्छा असेल त्यांनीच घराबाहेर जाण्याचे धाडस करावे, असा उपहासात्मक टोला त्यांनी मारला. औषध नसलेल्या कोव्हीड-19 पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जनतेने आणखी काही दिवस घरीच थांबावे, अशी विनम्र विनंती केली.









