पोलंडमध्ये गर्दी रोखण्यासाठी कडक नियम!
थेट पोलंडहून सिंधुदुर्गस्थित सुदेश देसाईने साधला संवाद
कोरोनाची साखळी तुटण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हाच पर्याय
तेजस देसाई / दोडामार्ग:
सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. भारतात कोरोनाची साखळी तुटावी, या उद्देशाने भारतात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, हे नियम अनेकांना हुकूमशाही वाटत असले तरी जगभरात स्थितीत तशी उद्भवली आहे. पोलंडमध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील कळणे (दोडामार्ग) गावातील सुदेश सुरेश देसाई हा युवक नोकरीनिमित्त असून त्याने ‘तरुण भारत’ च्या माध्यमातून कोरोना विषयी सरकार देत असलेले नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सध्या पोलंडमध्ये याच कोरोनाबाबत प्रचंड दक्षता घेतली जात असून आपणही शासन नियमांचे पालन करीत असल्याच्या भावना त्यांने व्यक्त केल्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसची साखळी तोडण्याच्या हेतूने ‘भारत लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला. सध्या तर जिल्हा संचारबंदीही करण्यात आली. कोरोना या भस्मासूराचा वध करायचा असेल तर विषाणूंची साखळी तोडणे हाच उपाय असून तो फॉर्म्युला अनेक जग वापरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ही समस्या नसून उपाय आहे. हाच उपाय सर्वांना तारणहार ठरणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगत पोलंडमधील परिस्थितीही कथन केली.
नियमांचे कडकोट पालन
या बाबत अधिक माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, आपण पोलंड येथील रोक्लॉक येथे कंपनीत कामाला दोन वर्षांपासून आहे. भारतात सुरुवातीला ज्या प्रमाणे प्राथमिक स्थितीत मॉल, स्विमींग पूल, हॉटेल्स, थिएटर आदी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तोच पोलंडमध्ये घेण्यात आला. इथे जवळपास 3500 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली तर 73 जण दगावले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना सुरू असून दोन व्यक्ती एकत्र फिरू शकत नाहीत. त्याचबरोबर प्रत्येकाला हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर दिले जात आहे. सध्या कंपनी सुरू आहेत. मात्र, कामगारांच्या कंपनीत येण्या-जाण्याच्या वेळा बदलल्या असून कामाच्या ठिकाणीही एकत्र कामगार नसतात. त्यामुळे कंपनी परिसरातही कामगार एकत्र होणार नाहीत, याचे कडक नियोजन आहे.
शासनाच्या सूचना फॉलो करा!
कोरोना हा जगभरात पोहोचला असून भारतात जे नियम शासनाने घातलेले आहेत, ते लादले गेले असे न समजता ते अंगिकृत करून शासन सुचनांचा फॉलो करा, असा संदेशही श्री. देसाई यांनी दिला.









