वडिलांच्या अंत्यविधीसाठी दिली राजस्थानी व्यक्तीला परवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करताच बेंगळूर येथे कामानिमित्त गेलेल्या परप्रांतीय कामगारांनी घरचा रस्ता धरला. मात्र, बेळगावात त्यांना बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान बंदिस्त असलेल्या एका राजस्थानी व्यक्तीच्या वडिलांचा मृत्यू रविवार दि. 12 रोजी झाला. त्यामुळे राजस्थानला जाण्याचा निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱयांकडे परवानगी मागितली होती. अखेर जिल्हाधिकाऱयांनी स्वखर्चाने जाण्यासाठी एकाच व्यक्तीला परवानगी दिली आहे. अंत्यविधीकरिता त्या व्यक्तीला जाण्यासाठी परवानगी दिल्याने प्रशासकीय अधिकाऱयांमध्येसुद्धा माणुसकी असते, याचा प्रत्यय जिल्हाधिकाऱयांच्या कृतीमधून दिसून आला.
लॉकडाऊन झाल्याने राजस्थानला जाण्यासाठी कामगारांनी पायी प्रवास सुरू केला होता. 60 कि. मी. चे अंतर चालल्यानंतर राजस्थानला जाणारे ट्रक दिसून आले. त्यामुळे त्या ट्रकना अडवून राजस्थानला सोडता का? अशी विचारणा केल्यानंतर ट्रक चालकाने होकार दर्शविला. 6 ट्रकमधून 350 कामगार राजस्थानला निघाले होते. मात्र बेळगावात येताच त्यांना बंदिस्त करून समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात ठेवले होते. या दरम्यान गावाला जाण्यासाठी कामगारांनी बराच आटापिटा चालविला होता. जेवण आणि राहण्याच्या मुद्दय़ावरून महापालिकेच्या अधिकाऱयांशी दररोज वादावादीचा प्रकार सुरू होता. तुमचे जेवण नको पण आम्हाला घरी जाऊ द्या, अशी विनवणी वारंवार केली होती. पण कोरोनाचा वाढता फैलाव पाहून जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. 21 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 15 तारीखनंतर सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. लॉकडाऊनचा कालावधी संपत आला असल्याने लवकरच आपली सुटका होईल, अशा अपेक्षेत सर्व कामगार होते. पण याचदरम्यान रविवार दि. 12 रोजी एका राजस्थानी व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्या व्यक्तीने गावाकडे जाण्याचा निर्णय घेऊन याबाबतची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांना दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांना सदर माहिती देऊन त्या व्यक्तीला जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. त्या व्यक्तीसोबत आणखी दोघांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. पण अंत्यविधीसाठी त्या एकाच व्यक्तीला सोडण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही परिस्थितीत कोणाही व्यक्तीला सोडणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली होती. मात्र, अंत्यविधीकरिता त्या व्यक्तीला जाण्यासाठी परवानगी दिल्याने प्रशासकीय अधिकाऱयांमध्येसुद्धा माणुसकी असते, याचा प्रत्यय जिल्हाधिकाऱयांच्या कृतीमधून दिसून आला.
खासगी वाहनाचे भाडे 30 हजार रुपये
त्या व्यक्तीला परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी राजस्थान सरकारशी चर्चा केली. त्या व्यक्तीला जाण्यासाठी खासगी वाहनाची व्यवस्था करून पाठविले. खासगी वाहनाचे भाडे 30 हजार रुपये ठरविण्यात आले असून सदर भाडे त्या व्यक्तीलाच भरावे लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वखर्चाने जाण्याची तयारी दर्शविल्यानेच जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
दि. 15 रोजी सुटका होणार या अपेक्षेत सर्व परप्रांतीय कामगार होते. पण लॉकडाऊनची मुदत वाढविल्याने या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. केंद्रासह राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने सर्व कामगारांना लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत बंदिस्त रहावे लागणार आहे.









