केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तथापि नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंसह औषधांचा मुबलक साठा देशात आहे. नागरिकांनी दैनंदिन गरजांसाठी धावाधाव करु नये आणि संत्रस्त होऊन तणावग्रस्त होऊ नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करा आणि कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी घरीच थांबा, असेही त्यांनी सुचवले आहे.
ट्विटरवरुन दिलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, सध्या कोरोना महामारीच्या संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य जनतेची काळजी घेण्यासाठी देशात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याआधीच लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीयांच्या जीवन रक्षणासाठी सरकार कार्यरत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहून काम करत आहे. जीवनावश्यक वस्तु आणि औषधांचा कोणताही तुटवडा देशात नाही. नागरिकांना कोणत्याही बाबी कमी पडणार नाहीत. आपल्या स्वतःबरोबरच परिसरातील गरीब, गरजुंना यथाशक्ती मदत करुन देशावर आलेले संकट टाळण्यासाठी साथ द्या, असे आवाहन गृहमंत्री शहा यांनी केले आहे. त्याचबरोबर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि सर्व सुरक्षा तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱयांचेही त्यांनी आभार मानले आहेत.









