भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात मोठय़ा उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात येते. डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन विश्वातील अनेक सोशित, वंचित घटक सक्षम होण्याचा प्रयत्न आजही करत आहेत. विषम समाजरचनेवर आधारलेल्या व्यवस्थेत वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आयुष्यभर लढा दिला. यात प्रामुख्याने देशासह जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक, आर्थिक, कायेदविषयक, महिलांविषयक, शैक्षणिक आणि अत्याधुनिक दूरदृष्टीने विविध विचारांची बांधणी केली. यातून त्यांनी अनेक समाज व राजकीय कार्याची मुहूर्तमेढ रोवली. असे विविध पैलू असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बाबासाहेबांची ओळख साऱया विश्वाला आहे. आज संपूर्ण जगासोबत देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामाना करत आहे. याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांची यंदाची 129 वी जयंती साजरी होत आहे, परंतु देशात संचारबंदी लागू असल्याने ही जयंती प्रथमच ऑनलाईन स्वरुपात साजरी केली जाणार आहे. हेच औचित्य साधून आज आपण बाबासाहेबांचे शैक्षणिक धोरण व बाबासाहेबांच्या स्वप्नातील विद्यार्थी कसा असावा या संदर्भातील मुद्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न करुया.
बाबासाहेबांना आयुष्यभर विषमतेचे चटके सहन करावे लागले. बाबासाहेब लहान असतानाच त्यांची आई निधन पावली. सुभेदार वडील रामजी हे सैन्यात असल्याने कडक शिस्तीचे होते. वडीलांच्या सान्निध्यात बाबासाहेबांची जडणघडण कधी कठोर शिस्तीच्या धाकात तर कधी त्यांच्या व मीरा अत्येच्या मायेच्या उबदार कुशीत झाली. याच दरम्यान बाबासाहेबांचे सर्व धर्मग्रंथाचे वाचन वडील रामजी हे करवून घेत होते. (महाभारत, रामायण आदी) दिवसेंदिवस बाबांच्या वाचनात विविध नवनवीन माहितीची भर पडत होती. परंतु यासाठी वडील रामजी वेगवेगळय़ा प्रकारची पुस्तके बाल भिमाला आणून देण्यासाठी जीवाचे रान करीत असत. हीच सवय पुढे उच्च शिक्षण घेत असताना त्यांना खूप उपयोग पडली असल्याची आठवणही बाबासाहेबांनी आपल्या आत्मकथनात लिहून ठेवली आहे. मी पदवीपर्यंत सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे होतो. परंतु पुढे मी विदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलो असता माझ्या वाचनाचा व्यासंग अधिक वाढवला. वाचनाच्या आवाक्मयामुळे अखंड पुस्तकच्या पुस्तक व त्यामधील एखाद्या पानावरील एखादा उतारा जसाच्या तसा माझ्या लक्षात राहत असे असेही बाबासाहेबांनी आत्मकथनात नमूद केले आहे. या सगळय़ा घटनांच्या मागोवातून बाबासाहेब आजन्म विद्यार्थी होते, हे नाकारता येत नाही. यामुळे आजच्या समाजव्यवस्थेत बाबासाहेबाना अपेक्षित असणारा विद्यार्थी घडतो आहे का? त्या काळात अनेक अडचणी होत्या परंतु सध्याच्या बदलत्या जीवनपद्धतीत तळमळीने विद्यार्थी घडतोय का? काळानुसार शिक्षण पद्धती बदलत आहेत, त्यासोबत करिअरचे मार्गही बदलत आहेत त्या बदलांचा स्वीकार करावा लागेल. हे खरेच आहे, परंतु विद्यार्थी म्हणून होत असणारी आजच्या विद्यार्थ्यांची वर्तणूक बदलून स्वतः सक्षमपणे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आजच्या विद्यार्थ्याने बाळगण्याची आवश्यकता आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याने आज बाबासाहेबांच्या जयंतीदिनी अंतर्मनात डोकावून शोधण्याची आवश्यकता आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाप्रसंगी विविध महापुरुषांप्रमाणेच बाबाहेबांनी उच्च विद्याप्राप्ती केलेली असतानाही देशातील सोशित व वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यातील अंतिम क्षणापर्यंत आपला देह झिजवला. तत्कालीन काळात मुंबई मॅजिस्ट्रेटसमोर आपल्या समाजातील उच्चशिक्षण घेण्यासाठी 16 विद्यार्थ्यांना विदेशात पाठविण्यासाठी बाबासाहेबांनी प्रस्ताव मांडला होता. तेक्हा मॅजिस्ट्रेटनी या 16 जणांवर खर्च करण्याऐवजी वंचित घटकांच्या उन्नत्तीसाठी सदरची रक्कम खर्च करण्याचे बाबासाहेबांना सुचविले. परंतु यावर डॉ. बाबासाहेबांनी मी उच्च शिक्षण घेतल्याने समाजातील शंभर ग्रॅज्युएट्सच्या तोडीस मी एकटा एका बाजूला असल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले होते. यावरूनच बाबासाहेबांचा स्वतःवरील शिक्षणामुळे दृढ झालेल्या आत्मविश्वास काय असतो ते खऱया अर्थाने पहावयास मिळाले. पुढे हे विद्यार्थीं उच्च शिक्षणासाठी पाठवून त्यांच्याकडून शेकडो देशातील लोकांचे जीवनमान बदलाचे ध्येय उराशी बाळगून बाबासाहेबांनी हा कठोर निर्णय घेतला होता. परंतु अंतिमतः जे व्हायला नको तेच झाले. या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण होताच, गडगंज पगारांच्या नोकऱया पटकावून विदेशातच तळ ठोकला. या घटनेचे पुढे बाबासाहेबांना मात्र खूप दुःख झाले, त्यानंतर विविध भाषणांमधून ‘मला अडाणी लोकांनी कधीच फसवले नाही, ते मीठ भाकर खाऊन माझ्यासोबत कायम राहिले परंतु ज्याच्यांकडून अपेक्षा ठेवली होती त्यांनीच आपल्याला दगा दिला असे बाबासाहेब खेदाने सांगत असत. प्रथम व शेवटपर्यंत भारतीय असल्याची प्रखर देशप्रेमाची नाळ कायम ठेवणाऱया बाबासाहेबांच्यासारखे खरे देशभक्त पुन्हा निर्माण होतील का? जगातील उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणाऱया भारताचे स्वप्न नव्याने सत्यात उतरवणाऱया विद्यार्थ्यांची या भारतमातेला गरज असून त्याला घडविण्याचे कामही आपल्या भारतीयांच्या खांद्यावर आहे.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र असल्याचे बाबासाहेबांचे ठाम मत होते. पुणे येथील अस्पृश्य विद्यार्थ्यांचे 11 वे संमेलन रविवार दि. 11 सप्टेंबर 1938 रोजी पुण्यात डी.सी.मिशन हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. संमलेनाचे अध्यक्ष व मुख्य वक्ते म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली होते. संमेलनात विद्यार्थ्यांचे मर्दानी व मैदानी खेळ, एक नाटय़प्रयोग वक्तृत्व कलेची चढाओढ व अन्य कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडले होते. त्यानंतर बाबासाहेबांचे मुख्य अध्यक्षीय भाषण पार पडले. आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्यांचे असले तरी यात बिगर विद्यार्थीच अधिक असल्याचे दिसून येईल. जसे खिचडीत तांदळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे. त्यामुळे माझे मुख्य भाषण विद्यार्थ्यांसाठी असल्याने इतरांची निराशा होणे स्वभाविक असल्याचे बाबासाहेब यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकटा मनुष्य आपल्या आयुष्यातील विविध प्ररकारची कार्य उत्तम प्रकारे पार पाडू शकत नाही. याबाबत एका ग्रंथकाराचे सुभाषित मला आठवते If you want success you must be narrow minded वरील म्हणण्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे. कारण एकटय़ा मनुष्याने सर्वच गोष्टी करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था करून घेणेच होय. त्यामुळे माणसाने लहान लहान कार्ये हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा. अशी सवय विद्यार्थीदशेपासून अंगी बाणवल्यास याचा पुढील काळात लाभ होतो. मी जरी राजकारण व समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थीच आहे. विश्वविद्यालयातील पदव्या आणि बुद्धिमत्ता याचा काहीही संबंध नसून दीर्घोद्योग व कष्ट केल्यानंतरच यश प्राप्ती होते. फक्त पदव्या मिळवून काहीही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नव्हे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्यामधील आत्मविश्वास न गमावता तो पूर्ण क्षमतेने आपल्या विचारांमध्ये जागृत ठेवण्याची गरज आहे. या जगात कोणतीही गोष्ट आत्मसात करावयाची असल्यास त्याकरिता आत्मविश्वास हवाच. कारण आत्मविश्वासासारखी दुसरी कोणतीही दैवी शक्ती नसल्याचे मी मानतो. मी इंग्लडमध्ये शिक्षण घेत असताना आठ वर्षांचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वीपणे पूर्ण केला आणि हे करण्यासाठी मी 24 तासामधील 21 तास अखंडपणे अभ्यास केल्यानेच हे यश मिळाले असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगितले.
डॉ. बाबासाहेबाच्या विद्यार्थी दशेतील आदर्श समोर ठेवून आपण 21 व्या शतकातील बाबासाहेबांच्या स्वप्नातील खंबीर व दीर्घोद्योगी विद्यार्थी होण्याचा प्रयत्न करुया. आज जगात माहितीचा विस्फोट झाला असून जग एका ‘टच’ वर येऊन थांबले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध टप्प्यावर विजय मिळवणारा मनुष्य आज कोरोनाच्या एका विषाणूच्या विळख्याने बंदिस्त झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विकसित होत असलेल्या बौद्धिक महाजालात प्रवेश करून नवीन रोजगारांची दारे शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. यातून उद्याच्या भारताचे भविष्य उभारणाऱया विद्यार्थ्याला सुभेदार रामजीप्रमाणे अभ्यासात कठोर पण आयुष्यात प्रेमळ मार्ग दाखणारे पालकही समोर येऊदेत. निवडक करिअरमध्येच आपल्या पाल्यास अडकवून न ठेवता त्याला जगाच्या बाजारात निर्माण झालेली सध्याची व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टिकटॉक यांना फक्त संवादाची साधने म्हणून ओळख करून न देता त्यांची दृष्टी बदलवून त्यांना आगामी काळातील व्यवसाय केंद असल्याची जाणीव बालवयातच करून द्यावी. तरच आपण खऱया अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील विद्यार्थी भारतमातेला देऊ शकू.
सागर कांबळे








