जीएसटीचा समभाग म्हणून 101 कोटी प्रदान : सरकारला दिलासा, अद्याप 267 कोटी येणे बाकी
प्रतिनिधी / पणजी
राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनलेली असताना केंद्र सरकारकडून चार दिवसांपूर्वी गोव्याला जीएसटीचा समभाग म्हणून सुमारे 101 कोटी रुपये आल्याने सरकारला थोडाफार दिलासा मिळाला. तथापि, केंद्राकडून अद्याप गोव्याला 267 कोटी रुपये येणे आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती पार बिघडलेली आहे आणि लॉकडाऊनमुळे मार्चच्या साधारणतः 18 तारीखपासून आजपर्यंत गंगाजळीत नव्याने रक्कम येऊन पडलेली नाही. दर महिन्याला गोव्याला जीएसटीच्या माध्यमातून 400 कोटी रुपये नव्याने मिळतात. परंतु गेल्या दोन महिन्यात राज्याकडे फारशी रक्कम आलेली नाही. 1 एप्रिलपासून नवा अर्थसंकल्प कार्यान्वित झालेला आहे. प्रत्यक्षात मात्र राज्याच्या गंगाजळीत कोणतीही रक्कम आलेली नाही. साधारणतः नवे आर्थिक वर्ष सुरू होताच राज्याचा महसूल हा थकबाकी येत असल्याने प्रचंड वाढत असतो. पण प्रथमच अशी उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून आलेले रुपये 101 कोटी हीच सरकारसाठी एक जमेची बाजू ठरलेली आहे. अजून राज्याला केंद्राकडून 267 कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्यासमोर याबाबत पेचप्रसंगच निर्माण झालेला आहे.









