प्रत्येक मनुष्य हा जन्मतःच विद्यार्थी असतो. मनुष्याच्या स्मृतीला सतत काही ना काही तरी बौद्धिक खाद्य हवे असते. ह्या सृष्टीमध्ये ज्ञानाची कमी नाही पण ते ज्ञान प्राप्त करणाऱयाची मात्र कमतरता आहे. आपण ज्ञानी व्हावे, सुखी व्हावे, श्रीमंत व्हावे, समृद्ध व्हावे अशी प्रत्येक मनुष्यप्राण्याची इच्छा किंवा मनीषा असते. परंतु, सर्वांनाच ज्ञानप्राप्ती, अर्थप्राप्ती, शक्ती, ऐश्वर्य आणि विवेकाची प्राप्ती होईलच असे नाही. कारण, हे सर्व प्राप्त करण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, तर कष्ट करण्याची वृत्ती अंगी बाळगावी लागते. अतोनात श्रम, अथक प्रयत्न आणि अपमान सहन करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये ओतप्रोत भरून आहे अशांनाच विद्या, लक्ष्मी आणि शक्तीची प्राप्ती होते.
संपूर्ण जगात 18 व्या आणि 19 व्या शतकात औद्योगिक क्षेत्रात नवनवीन क्रांति होऊ लागली. पुढे 20 व्या आणि 21 व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाने प्रवेश केला आणि व्यवस्थापकीयदृष्टय़ा एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर कार्य करत असतानाचे प्रशिक्षण व कार्य करत नसतानाचे प्रशिक्षण यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. ज्या संज्ञेला on & off job trainings असे म्हणतात. प्रशिक्षणाची मुदत संपल्यावर व्यक्ती ज्या वातावरणात वाढते त्याच वातावरणात त्यांना शिकवले पाहिजे. प्रशिक्षण पद्धतीचा उपयोग करून कामगार आणि व्यवस्थापकांना शिकवले पाहिजे. ह्या तंत्राचा उपयोग करून व्यवस्थापकांना नवखेपणा जाणवत नाही. त्यांच्याकडून कार्यपद्धती आणि साधनांचा सराव करायला हवा.
समर्थांनी ह्याविषयी दासबोधात सांगितलेले आहे की,
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण! उगाच ठेवी जो दूषण !
तो दुरातमा दुराभिमान ! मत्सरें करी!!
ऐसा अंतरी नासला !कामक्रोधें खवळलां !
अहंभावे पालटला ! प्रत्यक्ष दिसे !!
22-24/01/01
ह्याचा अर्थ असा की, ग्रंथ पूर्ण न वाचता जो त्या ग्रंथावर टीका करतो तो कुबुद्धीचा असतो. जो मनाने विकृत झालेला आहे. ज्याच्या मनात कामक्रोध खवळलेले आहेत असा मनुष्य अहंकाराने विनाशास पोहोचतो हे जगात सर्वत्र आढळते.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने बघायला गेल्यास जे कामगार किंवा व्यवस्थापक हे प्रशिक्षित नसतात, त्यांना व्यवस्थापनाविषयी ते ज्या आस्थापनेत किंवा संस्थेत काम करतात तेथे त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामत: त्यांच्यात विकृती निर्माण होऊन पुढे ते त्या संबंधित संस्थेकरिता एक आव्हान ठरतात.
प्रत्येक भरभराट होत असलेल्या औद्योगिक उपक्रमापुढे अनेक नवीन प्रश्न असतात त्यापैकी उद्योगसमूहाचा विस्तार कोणत्या दिशेने आणि कसा करावा? उत्पादनाची किती पातळी वाढवावी? नवीन वस्तूंचे उत्पादन कसे कार्यान्वित करावे? ह्या सर्व बाबींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. जो प्रमुख व्यवस्थापक असतो त्याला सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागते. त्याला प्रत्येक प्रश्नाची बारकाईने मीमांसा करावी लागते. प्रमुख व्यवस्थापकाला आवश्यकता वाटल्यास तज्ञाचा सल्ला घ्यावा लागतो. तसेच संपूर्ण अहवाल तयार करून अंतिम निर्णयाकरिता संचालक मंडळापुढे सादर करावा लागतो.
प्रमुख व्यवस्थापकांवर प्रचंड कामाचा आणि जबाबदाऱयांचा ताण असल्याने त्यांना आगळय़ा-वेगळय़ा स्वरूपाची कार्ये करण्यास वेळ मिळू शकत नाही. उच्च दर्जाच्या औद्योगिक क्षेत्रात असे प्रश्न नेहमीच निर्माण होतात. अशावेळेस व्यवस्थापकाने त्याच्या काही कामांची जबाबदारी दुसऱया व्यवस्थापकावर द्यावी. व्यवस्थापकांना विशेष प्रकल्प पूर्ण करता येत नसतील तर त्यांनी सामान्य परिस्थितीत जे कार्य करता येईल ते कार्य करावे. अशाचप्रकारे, विशेष दर्जाचे प्रकल्प पूर्ण करण्याने व्यवस्थापकांना नवीन ज्ञान आणि अतिउच्च अनुभव मिळू शकतो.
व्यवस्थापन प्रशिक्षण योजनेंतर्गत जे उद्योगसमूह झपाटय़ाने विस्तार करत असतात त्यांच्याशी भविष्यकाळात महत्त्वाच्या योजना राबविण्याकरिता बऱयाच व्यवस्थापकांची गरज असते. असे अनेक उद्योगसमूह नवे व्यवस्थापक निर्माण करण्यासाठी तसेच त्या व्यवस्थापकांचे कौशल्य संवर्धन करणे, व्यवस्थापक प्रशिक्षण योजनांची आखणी करणे, त्या कार्यान्वित करणे यास महत्त्व देतात. व्यवस्थापक प्रशिक्षण योजनेत जे निवडलेले युवक/युवती असतात त्यांना व्यवस्थापनशास्त्राचे सैद्धांतिक शिक्षण देणे, भाषणे-चर्चासत्रांचे आयोजन करणे, समूहचर्चा आणि प्रात्यक्षिक प्रकरणाचा अभ्यास करणे ह्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तसेच प्रशिक्षणार्थी युवक/युवतींना व्यवस्थापनाच्या विभिन्न विभागात निरनिराळी कामे शिकण्याची आणि विविध जबाबदाऱया पार पाडण्याची संधी द्यायला हवी. ह्या पद्धतींचा महत्त्वाचा फायदा असा की, प्रशिक्षणार्थी युवक/युवती हे सैद्धांतिक आणि व्यावहारिकदृष्टय़ा प्रगल्भ बनतात. प्रशिक्षित व्यवस्थापक नसतील तर परिस्थिती कशी बिघडू शकते ह्याचे उत्तम उदाहरण समर्थांनी दासबोधात निस्पृह शिकवण समासात दिले आहे. ते असे की,
जे जे पाहिजे तें तें नाही ! अन्नवस्त्र तेंहि नाहीं !
उत्तमगुण काहींच नाहीं ! अंतर्यामी !!
बोलतां येना बैसतां येना ! प्रसंग कांहीच कळेना!
शरीर मन हे कळेना ! अभासाकडे !! 06-07/03/18
ह्याचा अर्थ असा कीं, जीवनाला आवश्यक असते ते याच्याजवळ काहींच नसते. अन्न नाही, वस्त्र नाही आणि उत्तम गुणही नाही. नीट बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग कळत नाही आणि अभ्यासाकडे मन वळत नाही.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केल्यास या ओव्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. कारण असे बरेचसे अप्रशिक्षित व्यवस्थापक आणि कामगार अनेक उद्योगसमूह कार्यरत असतात ज्यांच्यामुळे संबंधित उद्योगांचा विकास करणे शक्मय होत नाही. त्यांना अपुरे ज्ञान असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होतो, ग्राहकांच्या मानसिकतेवर होतो आणि संपूर्ण उद्योग समूहालाच गालबोट लागते. म्हणूनच जे उत्तम व्यवस्थापक आहेत त्यांनी त्यांच्या कामासंबंधी अधिक जागरूक राहून व्यवस्थापकीय कौशल्य संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
माधव किल्लेदार








