प्रतिनिधी/ काणकोण
कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर काणकोण तालुक्यातील काजू उत्पादकांना जबरदस्त फटका बसला होता. मात्र सरकारने काही अंशी त्यात शिथिलता आणून काजू खरेदीला मुभा दिल्यानंतर काणकोणच्या मार्केट यार्डात काजू देण्यासाठी शेतकऱयांची एकच गर्दी होऊ लागली आहे. अवघ्या दोन दिवसांत 50 टन इतक्या काजूची खरेदी यार्डात करण्यात आली आहे.
या यार्डात गोवा बागायतदार, आदर्श कृषी सहकारी संस्था, मे. सतीश फळगावकर, कुष्टा वेळीप आणि दिलजित अशा मिळून पाच ठिकाणी काजू खरेदी केली जाते. मात्र बागायतदार संस्था आणि आदर्श कृषी सहकारी संस्थेकडून विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. यंदा काजूचा दर किमान 200 रुपये इतका मिळावा अशी मागणी कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि माजी मंत्री रमेश तवडकर या दोघांनीही सरकारकडे केली होती. मात्र सरकारने हा दर 136 रुपयांवर स्थिर केला. परंतु कोरोना महामारीचा फटका या सर्वांनाच बसला असून सध्या प्रति किलो 105 रुपये या दराने काजू या ठिकाणी खरेदी केली जात आहे.
तालुक्यातील खोल, खोतीगाव आणि गावडोंगरी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. 11 रोजी मार्केट यार्डात विविध भागांतून आलेल्या शेतकऱयांनी एकच गर्दी केली होती. गोवा बागायतदार संस्थेचे संचालक रोहिदास टेंगसे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. प्रत्येक शेतकऱयांना टोकन देण्यात येत आहे. गर्दी न करता आपला माल आणावा अशी ताकीद प्रत्येकाला देण्यात येत असून नियंत्रण ठेवण्यासाठी खास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आदर्श संस्थेच्या दुकानावर देखील शेतकऱयांनी गर्दी केली होती. या तालुक्यात 3443 हेक्टर क्षेत्रात काजूची लागवड असून त्यातून 170 टन इतक्या काजुबिया उपलब्ध होत असतात. यंदा पीक जरी उशिरा आलेले असले, तरी ते समाधानकारक राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.









