वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
कोरोना व्हायरस महामारीमुळे आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये युरोपियन तसेच अमेरिका आणि आशिया खंडातील फुटबॉल क्लब सहभागी होणार होते पण जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट पसरले असून युरोपियन देशांना या महामारीचा जबरदस्त फटका बसला असल्याने ही स्पर्धा 2020 साली खेळविली जाणार नाही, असे स्पर्धा आयोजक समितीचे प्रमुख कार्यकारी डॅनी सिलमन यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे ऑलिंपिकसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 2020 चे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक कोरोनामुळे संपूर्ण कोलमडले आहे. 2013 साली ही मित्रत्वाची आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदा खेळविण्यात आली होती. गेल्यावर्षी या स्पर्धेत 12 संघांचा समावेश झाला होता.









