जगभरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना अनेक देशांनी भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉल यासारख्या औषधांच्या पुरवठय़ासाठी मदत मागितली आहे. भारतानेही कोरोना विरोधी युद्धात सर्व देशांना शक्य ती सर्व मदत करू असा विश्वास जगाला दिला आहे. याचदरम्यान अनेक देशांनीही संसर्ग रोखण्यासाठी भारताकरता मदतीचा हात पुढे केला आहे. चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरिया हे देश भारताला वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करत आहेत. तर जागतिक बँकने भारताला भरभक्कम आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
1 अब्ज डॉलर्सची मदत
जागतिक बँकेने भारतासाठी 1 अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. जागतिक बँकेने मदतीचा सर्वात मोठा हिस्सा भारताला दिला आहे. या मदतीतून भारतात प्रभावी स्क्रीनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि प्रयोगशाळा डायग्नोस्टिक्समध्ये मदत होणार आहे. तसेच भारत वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची खरेदी करू शकणार आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानसाठी 20 कोटी डॉलर्स आणि अफगाणिस्तानसाठी 10 कोटी डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेने भारताला 29 लाख डॉलर्सचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा वापर टेस्ट लॅब, नव्या रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांवर देखरेख, तांत्रिक सहाय्यासाठी केला जाणार आहे.
चीनकडून पीपीई किट्स
कोरोना विषाणूच संसर्ग चीनच्या वुहान शहरातूनच उद्भवला आहे. अशा स्थितीत विषाणूसंबंधी चीनची माहिती तसेच तयारी सर्वाधिक आहे. चीननेही भारताला मदतीचा प्रस्ताव दिला आहे. चीनने कोरोनाविरोधी युद्धात भारताला पीपीई किट्स देऊन मदत केली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांकडून वापरल्या जाणारी वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे 1.7 लाख किट्स चीनकडून मिळाले आहेत. चीनच्या मदतीमुळे भारतातील पीपीईचा आकडा 3,87,473 झाल आहे. राज्यांना केंद्र सरकारकडुन आतापर्यंत 2.94 लाख पीपीईंचा पुरवठा करण्यात आला आहे. पीपीईमध्ये मास्क, ग्लोव्ह्ज, गाउन, ऍप्रन, फेस प्रोटेक्टर, फेस शील्ड, स्पेशल हेल्मेट, रेस्पिरेटर्स, आय प्रोटेक्टर, गॉगल्स, हेड कव्हर, शू कव्हर, रबर बूट्सचा यांचा समावेश असतो.
दक्षिण कोरियाकडून रॅपिड टेस्ट किट्स

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काही देशांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी करत आहे. यानुसार आयसीएमआरने दक्षिण कोरियासह काही देशांकडून रॅपिड टेस्ट किटची खरेदी केली आहे. गरज लक्षात घेत 5 लाख रॅपिड टेस्ट किट्सची खरेदी करण्यात आली आहे. सध्या देशात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना मोठय़ा संख्येत क्वारेंटाईन करण्यात येत आहे. अशा स्थितीत बाधितांची ओळख लवकर पटविण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंगची मदत घेतली जाणार आहे. याचे निष्कर्ष काही तासातच मिळतात. पारंपरिक आरटी-पीसीआर टेस्टपूर्वी अँटीबॉडी टेस्ट करण्यात आल्यास स्क्रीनिंगचे काम सोपे होणार आहे. पीसीआर टेस्टची कमतरता असण्यासह ही चाचणी महागडी तसेच जटिल असते. तसेच याचा अहवाल मिळण्यास अधिक वेळ लागतो.
जर्मनीकडूनही मदत

केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. अत्यंत लवकरच देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्sय कोरोनासंबंधी चाचणी सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही आठवडय़ांमध्ये देशात प्रतिदिन 1 लाख लोकांची चाचणी केली जाणार असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. यानुसार केंद्र सरकारने जर्मनीकडून 10 लाख टेस्ट किट मागविण्याची ऑर्डर दिली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी प्रोब नावाच्या किटचा वापर केला जातो आणि याची निर्मिती जर्मनीत केली जाते. आयसीएमआर खासगी कंपन्यांच्या मदतीने तयार केल्या जाणाऱया स्वदेशी किटचा पर्याय पडताळून पाहत आहे. तर जर्मनीने स्वतःच्या सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांना सर्व कामे बाजूला ठेवून व्हेंटिलेटर निर्मितीचा आदेश दिला आहे.









