नगर पंचायतीच्या उपक्रमामुळे समाधान : मुख्य चौकात निर्जंतुकीकरण फवाऱयांतूनच प्रवेश : आणखी चार मार्गिका नव्याने सुरू करणार-नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची माहिती
वार्ताहर / कणकवली:
कणकवली न. पं.मार्फत शहरात आप्पासाहेब पटवर्धन चौकात शुक्रवारी सकाळपासून कोरोना निर्जंतुकीकरण मार्गिका कार्यान्वित करण्यात आली. या मार्गिकेतून जाणाऱया व्यक्ती, वाहनावर ही फवारणी करण्यात येत आहे. कणकवली शहरातील व येथे येणाऱया तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरात अजून चार ठिकाणी निर्जंतुकीकरण मार्गिका उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिली.
कणकवली न. पं.तर्फे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पटवर्धन चौकात निर्जंतुकीकरण मार्गिका उभारत कोरोनाला रोखण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. कमान उभारून त्यात ही फवारणी सुरू आहे. बाजारपेठेतील रस्त्यावरून जाणाऱया प्रत्येकावर ही फवारणी होत आहे. या फवारणीसाठी 1 हजार लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये 1 लीटर सोडियम हायपोक्लोराईड, 5 लीटर डेटॉल मिक्स करून ही फवारणी सुरू आहे. 6 बाय 6 मीटरची ही मार्गिका बनविण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी या मार्गिकेवर सेन्सर लावण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील हे फवारे कायम सुरू न राहता तेथून ये-जा करणाऱयांनाच उपलब्ध होतील, अशी माहिती पिंपळे यांनी दिली.
शहरात श्रीधर नाईक चौक, छ. शिवाजी महाराज चौक, रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ व सध्या उभारण्यात आलेल्या मार्गिकेसमोर कलमठच्या बाजूने अशा चार मार्गिका नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. पुणे व कागल येथे अशाप्रकारे मार्गिका सुरू करण्यात आली आहे. जिल्हय़ात एवढय़ा मोठय़ा स्वरुपात कणकवली न. पं.ने ही मार्गिका बनविली आहे, अशी माहिती नलावडे यांनी दिली.
या मार्गिकेच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अतुल पिंपळे, नगरसेवक अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, शिशीर परुळेकर, बंडू गांगण, सुशील पारकर आदी उपस्थित होते.
न. पं.च्या सहकार्याने कलमठ, वरवडे आदी भागातही धूरफवारणी व जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. रविवारी हळवलमध्ये औषध फवारणीसाठी न. पं.ची मशीन पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पिंपळे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून समाधान
सिंधुदुर्गनगरी येथे जात असताना पालकमंत्री उदय सामंत यांनीही पटवर्धन चौकात थांबत न. पं.च्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.









