आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, अनारोग्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडलेल्या डॉक्टर, परिचारिका, आणि आरोग्य सेवा कर्मचाऱयांचे महत्त्व ‘कोरोना’ विषाणुने पुनश्च आपल्याला पटवून दिले आहे. आरोग्य व्यवस्था चक्रातील महत्त्वाचे अंग म्हणजे ‘परिचारिका’ आणि ‘मिडवाईव्हज्?’. ते आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. प्रतिबंधात्मक लसीकरण असो वा उपचारात्मक सेवा. इतकेच काय मोठ-मोठय़ा शस्त्रक्रियांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. शाश्वत विकासाच्या शृंखलेतील ‘आरोग्य’ आणि ‘कल्याणा’चे ध्येय 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी जगभरात नऊ दशलक्ष परिचारिकांची कमतरता आहे. 2020 हे वर्ष जागतिक आरोग्य परिषदेने ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका आणि मिडवाईव्हज्? वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे योजिले आहे. जागतिक आरोग्य दिनाचे यावषीचे लक्ष्यही ‘परिचारिका आणि मिडवाईव्हज्’ ला समर्पित करण्यात आले आहे. भारतामध्ये ‘परिचारिके’ चे शिक्षण घेण्यासाठी ‘ऑक्सीलरी नर्स मिडवाईफ्री’ (एएन्एम्), ‘जनरल नर्सिंग मिडवाईफ्री’ (जीएन्एम्), बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, मास्टर्स ऑफ सायन्स इन नर्सिंग असे अभ्यासक्रम शासकीय आणि खासगी शिक्षण संस्थांमार्फंत चालवले जातात. यापैकी एएन्एम् आणि जीएन्एम् हे अभ्यासक्रम अविद्यापीठीय आहेत. आपल्याकडे 2006-07 मध्ये परिचारिकेचे शिक्षण देणाऱया संस्थाचे प्रमाण 25 टक्के होते. 2015-16 मध्ये हे प्रमाण वाढून 202 टक्के इतके झाले. परिचारिकेचे शिक्षण देणाऱया 88 टक्के शैक्षणिक संस्था या खासगी आहेत. भारतीय परिचारक परिषदेने 2016 मध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील परिचारिकेचे शिक्षण देणाऱया संस्थांपैंकी 60 टक्के संस्था या एएन्एम्
(23%) आणि जीएन्एम् (37%) चे शिक्षण देणाऱया आहेत. केवळ 20 टक्के संस्था या बीएस्सी इन नर्सिंगचे शिक्षण देणाऱया आहेत. एमएस्सी नर्सिंग वा तत्सम पदव्युत्तर शिक्षण पुरवणाऱया संस्थांचे प्रमाण 20 टक्के इतकेच आहे. खासगी शिक्षण संस्थांमधून पदवी वा पदव्युत्तर नर्सिंगचे शिक्षण घेणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेरची गोष्ट आहे. भौगोलिकदृष्टय़ा नर्सिंगच्या शिक्षण संस्थांमध्ये तफावत असल्याचे दिसून येते. नर्सिंग पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण देणाऱया संस्थांचे प्रमाण दक्षिणेकडे अधिक असल्याचे पहावयास मिळते. नर्सिंगचे शिक्षण देणाऱया 40 टक्के संस्था या दक्षिणेकडील राज्यात आहेत तर उत्तरेकडील राज्यात हे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.
आज देशात जवळ-जवळ वीस लाख परिचारिकांची कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार दर हजार लोकसंख्येमागे परिचारिकांचे प्रमाण 2.5 इतके असायला हवे जे आपल्याकडे 1.7 इतकेच आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण देणाऱया शासकीय शैक्षणिक संस्थांची कमतरता, खासगी शैक्षणिक संस्थांची अवाढव्य फी आणि शिक्षणाचा दर्जा, नर्सिंग सेवा क्षेत्राला समाजात असणारे स्थान, सहकर्मचाऱयांकडून मिळणारी वागणूक, तुटपुंजे वेतन आदि घटक नर्सिंग सेवा क्षेत्राकडे तरुणाईची पावले न वळण्यास कारणीभूत ठरतात. हे क्षेत्र गैरसमजुतीमुळे केवळ महिलांचे समजले जाते. त्यामुळे पुरुषांचे या क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ज्या भागात चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण, सेवाभावी वृत्ती आणि सराईतपणे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास रुजवला जातो तेथील नर्सिंग प्रशिक्षिणार्थी चांगले वेतन, सुविधा आणि सन्मान देणाऱया कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आखाती देश आणि युरोपीय खंडातील देशांकडे आकर्षित होतात. भारतात वीस वर्षे अतिदक्षता विभागात काम केलेल्या परिचारकाला साधी वेदनाशामक औषधे शिफारस (प्रिस्क्राईब) करण्याची वा डॉक्टरांच्या अनुपस्थितीत इंजेक्शन देण्याची अनुमती नाही. याउलट पावला-पावलावर कायद्यावर बोट ठेवून चालणाऱया अमेरिकेमध्ये रुग्णांना भूल (ऍनस्थेशिया) देण्याचे तांत्रिक काम करणाऱया परिचारिकांची संख्या 70% च्या जवळपास आहे. अनेक निपुण परिचारिकांच्या उपस्थितीत डॉक्टर आत्मविश्वासाने, निशंकपणे आणि लालित्याने शस्त्रक्रिया पार पडतात. प्रश्न विश्वासार्हतेचा, जबाबदारीच्या जाणिवेचा आणि यथोचित सन्मानाचा आहे. विकसित तंत्र-विज्ञान, जीवनशैलीत झालेले बदल, रासायनिक भडिमारांचे खाद्य उत्पादन, वाढते नागरीकरण, शहरीकरण या प्रवासात आरोग्याचे प्रश्नही वाढीस लागले आहेत. सरासरी आयुर्मान वाढून सत्तरीपर्यंत पोहोचले आहे. त्याबरोबरच नवीन आजारांची साखळीही निर्माण झाली आहे. मधुमेह, अर्धांगवायु, मूत्रपिंडांचे आजार, कर्करोग, वार्धक्मयजन्य डिमेन्शिया सारख्या आजारांना विशेष उपचारांबरोबरच नर्सिंग केअरची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते.
भारतात अनेक राज्यांतील (विशेषत: उत्तरेकडे) ग्रामीण भागात पुरुष प्रधान संस्कृती, वाहतुकीची असुविधा, शिक्षण माध्यमातील उणीवा कारणांमुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक स्तरावर मुलींमध्ये शिक्षण अर्धवट सोडून देण्याचे प्रमाण अधिक आहे. शिक्षणाचा लवचिक आराखडा आणि उचित प्रशिक्षणाची सोय केल्यास शिक्षणापासून वंचित राहिलेला घटक मोठय़ा प्रमाणात कुशल मनुष्यबळात परावर्तित होऊ शकेल. परिचारिकांमधील क्षमतांच्या विकासास चालना दिल्याने, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव दिल्याने आरोग्य सेवा अधिक सुरळीत होण्यासोबतच लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यास आणि आर्थिक वृद्धीदर सुधारण्यास मदत होईल. भारतात सद्यस्थितीत नर्सिंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर 88:12 आहे. ‘सेवाभाव’ वृत्तीत लिंगभाव समानता आणण्यासाठी मोठी संधी आपल्यापुढे आहे.
‘कोरोना’ या वर्तमानातील संकटाने आपल्याला धोरणात्मक पुनर्विचारासोबत आत्मपरीक्षणाची संधी दिली आहे. आपण काम करीत असलेल्या क्षेत्रातील वर्तमान स्थिती, भविष्यातील आव्हाने, कमतरता आणि त्यावरील उपाय आदि गोष्टींवर विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. आरोग्य सेवा क्षेत्राचे महत्त्व आणि त्यातील कमतरतांची जाणीव करून दिली आहे. जागतिक स्तरावर परिचारिका आणि सेवा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग सत्तर टक्के आहे. देशात आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर यांचा अवमान केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी संरक्षक सैनिक बनून रोज घराबाहेर पडणाऱया आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक सेवार्थीबाबत देशवासियांमध्ये कृतार्थ भाव जागा करण्याचे प्रतिकात्मक काम टाळीनाद, दीप प्रज्वलनच्या माध्यमातून देशाच्या नेतृत्वाकडून केले जात आहे. कोरोना विषाणु संसर्गाशी लढा देणाऱया या फळीचे मनोबल उंचावण्याकरिता पंतप्रधान स्वत: संवाद साधत आहेत. सोबतच त्यांच्या संरक्षणाचा विश्वासही दिला जात आहे. 26 मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी आरोग्य सेवाकांसाठी आखलेल्या विशेष विमा योजनेने आरोग्यकर्मीना मोठा दिलासा आहे. मुंबई आणि दिल्ली महानगरांमध्ये 57 परिचारिकांना (7 एप्रिलपर्यंत) कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आरोग्यकर्मींची जोखीम दर्शविते. आपण आरोग्य सेवा-सुविधांच्या बाबतीत प्रगत देशांच्या तुलनेत कमी असलो तरी उपलब्ध साधन-सामुग्री आणि मनुष्य बळातच आपल्याला या संकटातून तरुन जायचे आहे. आपण सर्वांनी स्वत:चे आणि इतरांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे हे आजच्या घडीला महत्त्वपूर्ण आहे.









