वार्ताहर / देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील साडवली व संगमेश्वर आर. एच. सेंटरमधून चौघाजणांचे कोरोना रिपोर्ट मिरज मेडिकल कॉलेज सांगली येथे पाठवण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी एस. एस. सोनावणे यांनी दिली.
साडवली येथील मीनाताई ठाकरे विद्यालयात कोरोना आपत्ती कक्ष उभारण्यात आला. या ठिकाणातील दोघांचे व संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या दोघांचे कारोना रिपोर्ट मिरज मेडिकल कॉलेज, सांगली येथे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट तालुका आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला असून तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. साडवली येथे एकूण 81 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. आता तालुक्यातील 68 जण क्वॉरंटाईन असून साडवली येथे 100 जणांना ठेवण्याची व्यवस्था आहे. तर त्यानंतर साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात दुसरे सेंटर उभारण्यात आले असून साडवली येथील जागा भरल्यानंतर क्वॉरंटाईनना साखरपा येथे ठेवले जाणार आहे.









