कोरोनामुळे वर्ल्ड ऍथलेटिक्सने घेतला निर्णय, 1 डिसेंबरपासून पात्रतेस सुरुवात होणार
वृत्तसंस्था/ लंडन
वर्ल्ड ऍथलेटिक्सने येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत आठ महिन्यांसाठी टोकियो ऑलिम्पिक पात्रता थांबविण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे डिसेंबरनंतर होणाऱया स्पर्धांतच क्रीडापटूंना आता ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वेगाने पसरत असलेल्या कोव्हिड 19 महामारीमुळे ऍथलेटिक्स कमिशन, एरिया प्रेसिडेंट्स व कौन्सिल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे वर्ल्ड ऍथलेटिक्सने सांगितले.
‘टोकियो ऑलिम्पिकची पात्रता प्रक्रिया सध्या थांबविण्याचा निर्णय घेतला असून 6 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आता क्रीडापटूंना पात्रता मिळविता येणार नाही,’ असे वर्ल्ड ऍथलेटिक्सने सांगितले. ‘या कालावधीत होणाऱया स्पर्धांमध्ये खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी ठेवण्यात आलेली मर्यादा पार केली किंवा मानांकन मिळविले तरी ते पात्रतेसाठी ग्राहय़ मानले जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धांत केलेल्या नव्या विश्वविक्रमांची नोंद केली जाईल. पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही.
‘सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. त्याचा प्रभाव लवकर कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पात्रता कालावधी निलंबनाचा निर्णय घेतलेला आहे. हा कालावधी संपल्यानंतर त्यावेळची स्थिती पाहून 1 डिसेंबरपासून पात्रतेची प्रक्रिया सुरू केली जाईल. पात्रतेची प्रक्रिया 2019 पासूनच सुरू झाली असून आता त्यात आधीपेक्षा चार महिन्यांची वाढ झालेली असेल,’ असे वर्ल्ड ऍथलेटिक्सने सांगितले.
या निर्णयाबद्दल बोलताना वर्ल्ड ऍथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को म्हणाले की, ‘ऍथलीट्स कमिशन व कौन्सिलने जे सविस्तर कार्य केले आणि त्यांनी जो फीडबॅक दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पात्रतेची प्रक्रिया ठरावीक कालावधीसाठी निलंबित केल्याने क्रीडापटूंना निश्चिंत होऊन योजना आखता येतील आणि पात्रतेची तयारी करता येईल. सध्या जवळपास सर्वच देशांनी हवाई वाहतूक बंद ठेवली असून लॉकडाऊन केव्हा मागे घेतले जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे जगभरातील क्रीडापटूंसमोर या कालावधीत होणाऱया स्पर्धांत भाग घेणे अडचणीचे ठरू शकले असते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच नोव्हेंबरअखेरपर्यंत प्रक्रिया निलंबित करण्यात आली आहे,’ असेही ते म्हणाले.
ज्यांनी आतापर्यंत पात्रता मिळविली आहे, त्यांना पुन्हा पात्रता सिद्ध करण्याची गरज नाही. त्यांच्या फेडरेशनतर्फे त्यांची ऑलिम्पिक पथकात निवड केली जाऊ शकते. 50 किमी चालणे व मॅरेथॉनसाठी 31 मे 2021 आणि अन्य क्रीडाप्रकारांसाठी 29 जून 2021 ही टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याची अंतिम मुदत राहणार आहे. आठ महिन्यांचा निलंबित कालावधी विचारात घेता पात्रतेचा कालावधी आधीपेक्षा चार महिन्यांनी वाढला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









