वडीलही कोरोना व्हायरसचे बळी
वृत्तसंस्था/ रोम
ऑलिम्पिक स्पर्धेत 800 मी. शर्यतीच्या अंतिम फेरी दोनदा गाठलेला इटलीचा धावपटू दोनातो साबिया कोव्हिड 19 ची लागण झाल्याने निधन पावला. निधनसमयी तो 56 वर्षांचा होता, असे इटालियन ऑलिम्पिक समितीने (सीओएनआय) बुधवारी सांगितले. त्याच्या वडिलांचेही काही दिवस आधी कोरोनामुळे निधन झाले होते.
सीओएनआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसापासून साबिया पोटेन्झामधील सॅन कार्लो हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात होता.’ 1984 मध्ये झालेल्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये साबियाने 800 मी. शर्यतीत पाचवे तर चार वर्षांनंतर झालेल्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये त्याने सातवे स्थान मिळविले होते. याच क्रीडा प्रकारात त्याने 1984 मध्ये झालेल्या युरोपीयन इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. कोरोना व्हायरसमुळे निधन पावलेला साबिया हा पहिला ऑलिम्पिक फायनलिस्ट ऍथलेट असल्याचेही इटालियन ऑलिम्पिक समितीने सांगितले.
साबिया हा अतिशय प्रतिभावान पण शांत स्वभावाचा ऍथलीट होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडलांचेही कोरोना व्हायरसमुळे निधन झाले होते, असे इटालियन ऍथलेटिक्स फेडरेशनने सांगितले. एकाच कुटुंबात घडलेली ही अतिशय दुखद घटना असल्याची भावना या फेडरेशनचे अध्यक्ष अल्फिओ जिओमी यांनी व्यक्त केली.









