मुख्यमंत्र्यांची घोषणा पण अद्याप बरेच काम बाकी
मडगाव / प्रतिनिधी
आज होणार, उद्या होणार… अशा किती तरी घोषणा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या संदर्भात सरकारने केल्या. मात्र, ‘कोविड-19’ साठी का होईना, या इस्पितळाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. उद्घाटन न करताच सद्या त्याचा वापर ‘कोरोना व्हायरस’साठी केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण झाल्याचे ऐकून आपल्याला अतिशय आनंद झाला व आत्ता हे इस्पितळ कोरोनाची लागण झालेल्या संशयित व रूग्णांना ठेवण्यास ‘क्वारन्टाइन सेंटर’ म्हणून मुख्यमंत्र्यानी जाहीर केल्याने श्री. कामत यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दक्षिण गोव्याचे इस्पितळ आठ वर्षांनी पूर्ण झाले
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम आठ वर्षांनी अखेर पूर्ण झाले व आज संकटकाळी ते लोकांच्या उपयोगी येणार आहे. हे इस्पितळ लवकर व्हावे यासाठी स्वता दिगंबर कामत सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करीत होते. पत्रकारांना घेऊन त्यांनी दोन वेळा या ठिकाणी पहाणी केली होती. तसेच येथे कोणत्या सुविधा उपलब्ध होतील याची माहिती दिली होती.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली तरी अद्याप बरेच काम अपूर्ण अवस्थेत आहेत. या इस्पितळासाठी आलेले फर्निचर तसेच कपाटे दाखल झालेली आहे. टाईल्स देखील दाखल झालेले आहे. ते अद्याप बसविण्याचे बाकी आहे. या ठिकाणी कामगार वर्ग आपआपले काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.
सरकारने केवळ कोरोना व्हायरसच्या संशयित व रूग्णांना ठेवण्यास ‘क्वारन्टाइन सेंटर’ बनविण्यासाठी काम पूर्ण झाल्याची घोषणा केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.