मसुरेत अल्प दराने भाजी विक्रीला उदंड प्रतिसाद
प्रतिनिधी / मसुरे:
मसुरेसारख्या ग्रामीण भागात भाज्यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या होत्या. याबाबत अनेकदा भाजी विक्रीतून विक्रेते आणि ग्राहक यांच्यातही वाद होत होते. मात्र, भाजी विक्रेत्यांकडून खरेदी आणि वाहतूक यात परवडत नसल्याने हा दर निश्चित केल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मसुरेवासीयांनी कमी दरात चांगल्या दर्जाची भाजी मसुरे येथे उपलब्ध करून देण्यासाठी मालवण येथील आस्था ग्रुपचे उमेश मांजरेकर, बंटी केनवडेकर आणि मनोज चव्हाण यांना सरपंच संदीप हडकर, छोटू ठाकुर, संग्राम प्रभूगावकर, लक्ष्मी पेडणेकर आणि ग्रामस्थांनी विनंती केली होती. ग्रामीण भागातील गरज ओळखून या ग्रुपने नफ्या तोटय़ाचा विचार न करता, मसुरे येथे रविवारी येऊन माफक दरात भाजी विक्री करून मसुरे ग्रामस्थांची सोय केली. निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी किमतीत भाजी विक्री करून नफेखोरी करणाऱयांना आळा घातला आहे.
मसुरे रविवार पेठ येथे शिस्तबद्ध पद्धतीने भाजी खरेदीसाठी ग्रामस्थांनी रांग लावली होती. सकाळी 9 ते 11 या वेळेत सुमारे 250 ग्रामस्थांनी याचा फायदा घेतला. शासनाने दिलेले नियम पाळून ग्रामस्थांनी भाजी खरेदी केली. तहसीलदार अजय पाटणे यांनी यासाठी सहकार्य केले. मर्डे सरपंच संदीप हडकर, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते आणि माजी सभापती छोटू ठाकुर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, डॉ. विश्वास साठे, उपसरपंच राजेश गावकर यांच्या उपस्थितीत या विक्रीचा शुभारंभ झाला. आस्था ग्रुपचे माजी अध्यक्ष हरी चव्हाण, अध्यक्ष उमेश मांजरेकर, बंटी केनवडेकर, राजा मांजरेकर, शुभम लुडबे, अविनाश मांजरेकर, संतोष परब, पुरुषोत्तम शिंगरे आदी उपस्थित होते.
नियोजनबद्ध भाजी विक्रीसाठी मसुरे पोलीस, मर्डे ग्रामपंचायत आणि पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, शैलेश मसुरकर, झुंजार पेडणेकर यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्था करण्यात आली होती. ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून ही विक्री करण्यात येत होती. पोलीस यंत्रणेनेही सूचना केल्या होत्या. सरपंच हडकर यांनी आस्था ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले.









