महिला-बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशीकला जोल्ले
वरवट्टी. / प्रतिनिधी
बेळगाव
कोरोना विषाणूमुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्यांची माहिती संग्रहित करण्याचे काम महिला आणि बाल कल्याण खाते तसेच आशा कार्यकर्त्यांच्यावतीने होत आहे. मात्र, आशा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. ही बाब निषेधार्थ आहे, असे महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशीकला जोल्ले यांनी सांगितले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना जोल्ले यांनी आशा कार्यकर्त्यांवर हल्ले केलेल्यांविरुद्ध कारवाई हाती घेण्यात आली असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत असल्याचे सांगून कोरोनासंदर्भात विरोधी पक्षाच्यावतीने होत असणाऱया टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. काँग्रेसचे आमदार जमीर अहमद हे एनआरसी सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगत आहेत. आणि खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. याबाबत त्यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला. देशात कोरोना विषाणूंमुळे असंख्य लोक संकटात असताना विरोधी पक्षाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचे काम होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशातील वास्तविक परिस्थिती समजून घेणे गरजेचे बनले असल्याचे मंत्री शशीकला जोल्ले यांनी सांगितले.









