चेन्नई
कोविड 19 च्या प्रकोपामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बुद्धिबळाने मात्र आपल्या चाली सुरूच ठेवल्या आहेत. प्रमुख आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या तरी खेळाडूंनी स्वतःला ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांत गुंतवून घेतले आहे. वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनने एक धाडसी पाऊल टाकले असून त्याने ऑनलाईन स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू पहिल्या मॅग्नस कार्लसन निमंत्रितांच्या बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. ही स्पर्धा 18 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार आहे.
या ऑनलाईन स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन गुरुवारी करण्यात आले असून विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन कार्लसन सात नामवंतांविरुद्ध रॅपिड स्पर्धेत राऊंड रॉबिन पद्धतीने खेळणार आहे. ऑनलाईनवर खेळल्या जाणाऱया या स्पर्धेसाठी 250,000 डॉलर्स एकूण बक्षीस रक्कम ठेवण्यात आली असून ऑनलाईनवरील ही सर्वाधिक बक्षिसाची पहिली स्पर्धा आहे. यातील विजेत्याला 70,000 डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण म्पे24.म्दस् वर पाहता येणार आहे. आतापर्यंत ग्रँडमास्टर्स डिंग लिरेन, मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्ह, इयान नेपोमनियाची, अलिरेझा फिरौझा यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. फिडेने परवानगी दिली असल्याचे त्याने स्पष्ट केले. याबरोबरच चाहत्यांसाठी पूरक स्पर्धा भरविण्याचाही त्याचा विचार आहे.
यात चाहत्यांना अव्वला स्पर्धक आणि वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनविरुद्धही खेळण्याची संधी मिळणार आहे.
कँडिडेट्स स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्याने फिडेला श्रेय दिले. पण रशियन सरकारने हवाई वाहतूक बंदी केल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यावरच थांबवावी लागली. त्यावेळी 7 फेऱया झाल्या होत्या आणि मॅक्झिम लॅग्रेव्ह व नेपोमनियाची यांनी 4.5 गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली होती. मात्र लांबणीवर टाकल्यामुळे या स्पर्धेवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आता स्थितीच पूर्ण बदलणार असल्याने खेळाडू ते कसे जुळवून घेतात ते पहावे लागले. मॅक्झिम व इयान सध्या आघाडीवर असले तरी फॅबियानो कारुआना विजेता ठरू शकतो, असे कार्लसन म्हणाला.









