प्रतिनिधी/ पणजी
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीतर्फे कोविड-19 करीता संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा दैनिक तरुण भारतचे सल्लागार मुख्य संपादक किरण ठाकुर यांनी रु. 11 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व लोकमान्यतर्फे निधीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी लोकमान्यचे प्रितम बिजलानी तसेच गायत्री दुभाषी नायक याही उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी यावेळी किरण ठाकुर यांच्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. कोविड-19 च्या बाबतीत राज्यात लॉकडाऊन चालू केल्यापासून आजपर्यंत आपल्याला जनतेचे उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे या राज्यात कोविड-19 हा फार नियंत्रित आहे. मुळात गोव्यात याचा फार प्रादुर्भाव होऊ शकलेला नाही कारण योग्य पद्धतीची काळजी घेण्यात आलेली आहे.
राज्यातील जनतेच्या बऱयाचशा समस्यांवर तोडगा निघालेला आहे. किराणा मालही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. भाजीही उपलब्ध आहे. व गोव्यात जे कोणी सकारात्मक रुग्ण सापडले ते गोव्याबाहेरून आलेले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लोकमान्यतर्फे संपूर्ण सहकार्याचे आश्वासन किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.









