ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
दिल्लीतील निझामुद्दीनप्रमाणे तबलिगी जमातने पाकिस्तानमधील काही शहरात इज्तिमाचे आयोजन केले होते. रायविंड शहरात झालेल्या या कार्यक्रमातून 40 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तबलिगी मरकझचे मुख्य केंद्र असलेले रायविंड शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये तेथील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
तबलिगींच्या कार्यक्रमातून कोरोनाचा फैलाव झाल्याने पाकिस्तानमध्येही घबराटीचे वातावरण आहे. रायविंड शहरातील कार्यक्रमानंतर तेथील 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यावर त्या जमातशी संबंधित आणखी 50 संशयित करोनाबाधितांना लाहोरपासून 50 किमी अंतरावर असलेल्या कसूर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी तबलिगींना हा कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. मात्र, तबलिगींनी ही सूचना धुडकाऊन लावत पाच दिवसीय कार्यक्रम पार पाडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या हजारो जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे.