वृत्तसंस्था /त्रिवेंद्रम :
अल्कोहोल पिडीत लोकांना लॉकडाऊन काळात डॉक्टरांच्या चिठ्ठीवरुन मद्य विक्री करण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायाधीश ए. के. जयशंकर नांबियार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारचा हा एकतर्फी निर्णय लोकांना अल्कोमुक्त करण्याऐवजी अल्कोहोलिक करणारा असल्याचीही टिका केली आहे.
लॉकडाऊन काळात मद्यविक्री बंद झाल्याने वैद्यकीय तसेच अन्य कारणास्तव नियमित मद्यपान करणाऱयांची मानसिक स्थिती बिघडून अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. गेल्या रविवारी एकाच दिवसात 8 जणांनी याच कारणाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यावर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली होती. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन, केरल मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन आणि काँग्रेसचे नेते टी. एन. प्रथपन यांनी याचिका दाखल करुन सरकारच्या निर्णयास विरोध केला. अल्कोहोल मुक्तीचे उपचार करताना रुग्णास काहीप्रमाणात मद्य सेवनास देण्याची चिकित्सा कोठेही नमूद नाही. आणि ते मूलभूत सिद्धांताविरोधात आहे, असा दावा केला. केरल सरकारचे वकील के. व्ही. सोहन यांनी मात्र अशा पद्धतीने उपचार केला जात असल्याचा दावा केला होता. तथापि न्यायालयाने मात्र त्याला ठाम विरोध दर्शवला आहे. असा कोणताही ठाम पुरावा नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय एकतर्फी असल्याचीही टिका केली आहे.









