केंद्र सरकारकडून कोरोनाच्या रॅपिड टेस्टला परवानगी
ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने कोरोनाच्या रॅपिड टेस्टला परवानगी दिली आहे. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत संबंधितांचा कोरोना रिपोर्ट मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रॅपिड टेस्ट अतिशय फायदेशीर ठरणार आहे. रॅपिड टेस्टमुळे आता कोरोनाचा रिपोर्ट अतिशय जलदगतीने मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे का हे लवकर समजून त्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.
रॅपिड टेस्टमधून अवघ्या ५ मिनिटांत कोरोनाचा रिपोर्ट मिळेल. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता रॅपिड टेस्ट अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ही चाचणी ब्लड टेस्टसारखीच असेल. व्यक्तीच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्याआहेत का याची माहिती या चाचणीतून मिळेल. त्यावरुन संबंधित व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही, हे समजणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









