प्रतिनिधी/ वैभववाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मात्र, भुईबावडा घाटमार्गावर चेकनाका नसल्यामुळे या घाटातून होत असलेली चोरटी वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा रिंगेवाडी व तिथवली जामदा पूल येथे माती टाकून मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. मात्र, याची पूर्व कल्पना नसल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. त्यांना गगनबावडय़ाहून करुळ घाटमार्गे पाठविण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही काही लोक वाहनाने फिरताना दिसत आहेत. तालुक्मयात तळेरे- कोल्हापूर मार्गावर करुळ येथे चेकनाका असून तिथे वाहनांना सोडले जात नाही. गगनबावडय़ाकडे ये-जा करण्यासाठी भुईबावडा घाटमार्गावर कुठेही चेकनाका नसल्याने लॉकडाऊनदरम्यान खारेपाटण गगनबावडा मार्गावर चोरटी वाहतूक सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. वाहनचालक व लोकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्यामुळे शेवटी प्रशासनाने भुईबावडा घाटमार्गाच्या पायाथ्याशी रिंगेवाडी येथे, तर तिथवली जामदा पुलानजीक रस्त्यावर माती टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. दरम्यान, याची माहिती नसल्याने कोल्हापूर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने अडकून पडली होती. त्यांना परत गगनबावडा करुळ घाटमार्गाने पाठविण्यात आले आहे. रस्ता बंदमुळे स्थानिक लोकांची गैरसोय होणार असली तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.









