कोरोनाच्या संकटात पडतेय अफवांची भर :
प्रतिनिधी/ बेळगाव
सारे कोरोनाच्या संकटात असतानाच देव-देवतांबद्दल अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या आठवडय़ात धर्मस्थळ मंजुनाथाचा दिवा विझल्याची अफवा पसरविण्यात आली होती. आता कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया सौंदत्ती यल्लम्मा देवीचे मंगळसूत्र तुटल्याची अफवा पसरविण्यात आली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले असले तरी रोज पूजेचे कार्यमात्र सुरुच आहे. कोरोनाचा संकट दूर झाले की दर्शनही सुरु होणार आहे. परिस्थिती अशी असताना मंगळवारी सायंकाळपासून यल्लम्मा मंदिराबद्दल अफवा पसरविण्यात येत आहेत. यासंबंधी मंदिराचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रवी कोटारगस्ती यांच्याशी संपर्क साधला असता ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या दर्शन बंद असले तरी पूजेचे कार्य नित्यनेमाने सुरु आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारचा अपशकुन झालेला नाही की देवीचे मंगळसुत्रही तुटलेले नाही. जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी मंदिरात रोज धार्मिक कार्य सुरु आहे. अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहन रवी कोटारगस्ती यांनी केले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला येतात. मंगळवारी सायंकाळपासून मंदराला व तेथील अधिकाऱयांशी संपर्क साधून भाविक विचारणा करीत आहेत. देवीचे मंगळसुत्र तुटले आहे का? मंदिरात अपशकुनाची घटना घडली आहे का? अशी सातत्याने विचारणा केली जात आहे.
अफवा पसरविण्यात असल्याची माहिती
गेल्या आठवडय़ात धर्मस्थळ मंजुनाथाचा दिवा विझल्याची अफवा पसरविण्यात आली होती. यासंबंधी स्वतः धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे यांनी खुलासा करुन दिवा विझला नाही. कोणी तरी विघ्नसंतुष्टानी उठविलेल्या या अफवा आहेत, असे जाहीर केले होते. आता सौंदत्ती येथील रेणूका यल्लम्मा शक्तीपीठाबद्दल अफवा पसरविण्यात येत असून ती खोटी असल्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी सांगितले आहे.









