मडगाव/ प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 22 मार्च पासून ‘कर्फ्यू’ जारी केला होता. काल बुधवार दि. 1 एप्रिल पर्यंत दक्षिण गोव्यात तब्बल 1674 कर्फ्यूचे उल्लंघन केल्याची नोंद पोलीस दप्तरात झाली आहे. कर्फ्यू मोडल्या प्रकरणी पोलिसांनी 61 जणांना अटक केली आहे तर 24 वाहने जप्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने होत असल्याने सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लागू केला असून तो 14 एप्रिल पर्यंत कार्यरत रहाणार आहे.
कर्फ्यू मोडल्या प्रकरणी 45 जणांवर एफआयआर नोंद केला असून दंडात्मक कारवाई करताना 4,39650 रूपये वसूल केले आहेत. कफ्यू मोडणाऱयांना पोलिसांनी सक्त ताकीद दिली असून ‘मेघाफोन’ वरून लोकांनी घरातून बाहेर पडू नये असा संदेश देखील दिला आहे. त्याच बरोबर नाकाबंदी करून वाहने घेऊन फिरणाऱयांना अटकाव केला जात आहे.
नाकाबंदीबरोबरच पोलीस वाहनातून गस्त घालीत आहे. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांची गर्दी होत असून त्या ठिकाणी देखील पोलीस कारवाई करताना आढळून येतात. खास करून मडगावच्या गांधी मार्केटात भाजी खरेदीसाठी जी झुंबड उडाली होती. त्यातून पोलीस यंत्रणेवर देखील ताण आला होता. गांधी मार्केटातील एकूण प्रकाराची गंभीर देखील प्रशासकीय यंत्रणेला घ्यावी लागली व नंतर गांधी मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जारी करावा लागला.
चोऱयांचे प्रमाण घटले
दरम्यान, राज्यात कर्फ्यू जारी असल्याने, रस्त्यावर धावणाऱया वाहनांची संख्या एकदम घटली आहे. त्याच बरोबर परराज्यातून वाहने येऊ शकत नाही. त्याच बरोबर पोलीस गस्त देखील वाढली आहे. याचा चांगला परिणाम दिसून आला तो चोऱयांवर. कर्फ्यू जारी होण्यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी चोऱयांचे सत्र चालूच होते. मात्र, कर्फ्यू जारी झाल्यानंतर चोऱया होणे बंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.









