प्रतिनिधी/ वास्को
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतरही ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने उज्वला योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2020 पर्यंत तीन महिने मोफत सिलींडर पुरवण्याचे जाहीर केले आहे. ही माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कोर्पोरेशने प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केलेली आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोव्यात 1082 लाभधारक आहेत. त्यांना 14.2 किलो वजनाचे मोफत एलपीजी सिलींडर देण्यात येतील. सिलींडरची संपूर्ण रिफील किंमत एप्रिल 2020 पर्यंत हस्तांतरण करण्यात येईल. मोफत एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यासाठी उज्वला लाभार्थ्यांच्या लिंक केलेल्या बँके खात्यात सदर रक्कम जमा होईल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांना महिन्याला एक सिलींडर देण्यात येणार आहे. रिफीलच्या पंधरा दिवसानंतर लाभार्थी नव्याने सिलींडर बुक करू शकतात. सिलींडर रिफील आयव्हीआरएस किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून करणे आवश्यक आहे.
तेल विक्री कंपनी (ओएमसी)च्या एलपीजी शोरूम कर्मचारी, गोडाऊन किपर्स, एलपीजी मॅकेनीक्स व एलपीजी डिलीव्हरी बॉईज, रिटेल कस्टमर एटेडंटस, ट्रक ड्रायव्हर्स यांच्यासह बल्क/पॅक ट्रान्सपोर्टर्स आपले जीव धोक्यात घालून ग्राहक व नागरिकांना इंधन वितरण करण्यासाठी झटत आहेत. या सर्वांचे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आभार व्यक्त केले आहे.
सेवा बजावताना धोका निर्माण झाल्यास पाच लाखांची मदत जाहीर
लॉकडाऊनच्या कठीण काळात एलपीजीचे शोरूम स्टाफ, गोडाऊन किपर्स, मेकॅनिक्स व डेलीव्हरी बॉईज स्वयंस्फुर्तीने आपली डय़ुटी बजावत असून देशातील सर्व ग्राहकांना एलपीजी सिलींडर पुरवठा करण्यासाठी निरंतर सेवा बजावत आहेत. या त्यांच्या सेवांबद्धल त्यांचे आभार व्यक्त करून कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या धोक्यातून एखाद्या कर्मचाऱयाला मृत्यू आल्यास पाच लाख रूपये देण्याचे महामंडळाने घोषित केले आहे. ही रक्कम त्यांच्या वारसदाराला देण्यात येईल. एलपीजी वितरण राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमाद्वारे होते. हिंदुस्थान कॉर्पोरेशनतर्फे लॉकडाऊन काळातही वितरण करण्यात येत आहे. एलपीजीची कमतरता नाही. ग्राहकांनी घाबरू नये असा सल्ला प्रसिध्दी पत्रकातून एचपी कोर्पोरेशनने दिला आहे.









