प्रतिनिधी/कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटल बुधवारपासून कोरोना हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत झाले आहे. बुधवारी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर बाहय़ रूग्ण विभाग स्थलांतरीत केल्याचा फलक लावला आहे. याची माहिती मिळेल तसे रूग्ण घेऊन रूग्णवाहिका सेवा रूग्णालयाकडे पाठवण्यात येत होत्या. हॉस्पिटलमध्ये शिवभोजन थाळीला सुरूवात झाली आहे. त्याचा लाभ रूग्ण, त्यांचे नातेवाईक घेत आहेत.
सीपीआर हॉस्पिटल फक्त कोरोना साथीशी निगडीत रूग्णांवर उपचार करण्यात येत आहे. बुधवारपासून त्याला सुरूवात झाली. कोरोना रूग्णांसाठी येथे आयसोलेटेड वॉर्ड करण्यात आले आहेत. तेथे काहींवर उपचारही सुरू झाले आहेत. सीपीआरमधील बाहय़रूग्ण विभाग, तपासणी बंद झाली आहे. बाहय रूग्ण विभाग लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात सुरू झाला आहे. त्याची माहिती देणारा फलक सीपीआर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. पण बाहेरून येणाऱया रूग्णांना सेवा रूग्णालय माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे रूग्णवाहिकाही पत्ताा शोधत जात आहेत. दरम्यान, सीपीआरमध्ये मंगळवारपासून शिवभोजन थाळीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या दिवशी 133 जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. बुधवारीही रूग्ण, नातेवाईकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.