वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिफाची 17 वर्षांखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा यापूर्वी जाहीर केलेल्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात होण्याची आशा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने वर्तविली आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताला लाभले आहे.
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. फिफाची 17 वर्षाखालील वयोगटातील महिलांची युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. अद्याप आठ महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने परिस्थितीमध्ये तोपर्यंत निश्चित सुधारणा दिसून येईल, अशी आशा निर्माण झाल्याने सदर स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये तूर्ताला तरी कोणताही बदल करण्याचा विचार नसल्याचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
फिफाची ही स्पर्धा 2 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नवी मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, भुवनेश्वर आणि गुवाहाटी या शहरामध्ये घेतली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात कोरोना व्हायरसमुळे टोकियो ऑलिंपिक स्पर्धा तसेच युरो चषक 2020 ची फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारतातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवरच फिफाच्या या विश्व करंडक महिलाच्या फुटबॉल स्पर्धेचे भवितव्य अवलंबून राहील. कोरोना व्हायरसच्या साथीत आतापर्यंत जगात 38 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 8 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारतामध्ये कोरोनाचे 40 बळी नोंदविले गेले असून किमान 1100 जणांना कोव्हिड-19 ची लागण झाली आहे.









