रत्नागिरी जिल्हय़ात सापडलेला एकमेव रुग्ण कोरोनामुक्त व संशयितांची संख्याही घटली आहे. कोरोनाला कोकणातून हद्दपार करण्याची लढाई ‘मेरिट’ मध्ये जिंकण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यामध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर नेहमीच शांत असणारा कोकण अधिकच शांत झाला. रत्नागिरी जिल्हय़ात सापडलेला एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने व संशयितांची संख्याही घटली आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच अग्रेसर असलेल्या जिल्हय़ाने कोरोनाविरोधातील परीक्षेतही डिस्टिंक्शन मिळवले आहे. मात्र, कोरोनाला कोकणातून हद्दपार करण्याची ही लढाई ‘मेरिट’ मध्ये जिंकण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सर्वात आधी महाराष्ट्राने कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी वेगाने निर्णय घ्यायला सुरुवात केली. या उपाययोजनांची अंमलबजावणी रत्नागिरी जिह्यातही काटेकोरपणे सुरू झाली. शाळा बंद झाल्या, सरकारी कार्यालयातील कर्मचारी संख्या नियंत्रणात आली, टप्प्याटप्प्याने रेल्वे व बस वाहतूक बंद झाली आणि जिल्हाही कोरोनासाठी ‘लॉक डाऊन’ झाला. अनेक नागरिकांनी ही बाब गांभिर्याने न घेतल्याने पोलीस यंत्रणेची काही प्रमाणात दमछाक झाली. नेमक्या त्याचवेळी दुबईहून परतलेला गुहागर तालुक्यातील एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यामुळे प्रशासन अधिक काटेकोर झाले. नागिरकांमध्येही कोरोनाचे गांभीर्य वाढल्याचे दिसले. प्रसंगी कारणाशिवाय भटकणाऱयांवर थोडी सक्तीही केली गेली. परंतु एकमेव रुग्णाच्या कोरोनामुक्तीमुळे जिह्याची लढाई योग्य दिशेने असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यासारखेच आहे. वेळप्रसंगी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरल्याचाही सकारात्मक परिणाम झाला.
चाकरमान्यांना गावबंदी
जिल्हय़ातील मोठय़ा संख्येने नागरिक नोकरी व्यवसायासाठी महानगरात राहतात. लॉकडाऊननंतर महानगरात राहणे अनेकांना आर्थिकदृष्टय़ा कठीण झाले, मूळ घरी राहणे अधिक सुरक्षित वाटू लागल्याने चाकरमान्यांचे लोंढे गावांकडे येऊ लागले. ही बाब जिह्याच्या आरोग्यासाठी चिंताजनक आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे 58 हजार चाकरमानी जिह्यात दाखल झाले आहेत. प्रशासनाने अशा सर्व नागरिकांची नोंद घेऊन त्यांच्यावर नजर ठेवली आहे. कोरोनाग्रस्त शहरातून आलेल्या आठशेहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळेही पहिल्या टप्प्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यंत्रणा यशस्वी ठरली आहे. ग्राम समित्यांच्या माध्यमातून गावातील घराघरावर नजर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सफल होत आहे. दरवेळी चाकरमान्यांना डोक्यावर घेणाऱया कोकणातील अनेक गावांनी चाकरमान्यांना केलेली गावबंदी आश्चर्यकारक तर आहेच शिवाय भविष्यातील सौहार्दासमोरही प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.
सागरी मार्गाचा अवलंब, दुचाकीने आडमार्गाने प्रवास, माल वाहतुकीच्या वाहनांत लपून प्रवास अशा प्रसंगांनी सुरक्षेच्या मर्यादा उघड झाल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अंतर्गत वादही मध्यंतरी चव्हाटय़ावर आला. आंबा व मत्स्य व्यावसायिकांकडे पहिल्या टप्प्यात यंत्रणेचे पुरते दुर्लक्ष झाले. चाकरमान्यांच्या लोंढय़ाचा प्रश्न विचारातही घेतला गेला नाही. मास्क व सॅनिटायझरच्या टंचाईवर तोडगा काढणे ही बाबही प्रशासनाची डोकेदुखी ठरली. वृत्तपत्र वितरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास विलंब झाला. पाणी टंचाईचा प्रश्न काही भागात डोके वर काढू लागला आहे मात्र त्याच्या नियोजनाचा प्राधान्यक्रम घसरलेला दिसतो. या सर्वच कारणांमुळे प्रशासनाला सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे अनेक लोकप्रतिनिधी आणि तथाकथित समाजसेवकही सध्या ‘सेल्फ क्वारंटारईन’ आहेत. या कठीण प्रसंगाने माणसे ओळखण्याची संधी मात्र कोकणी माणसाला मिळाली आहे आणि ती संधी तो गमावणारही नाही.
रत्नागिरी जिह्यातील प्रशासनाने लक्षात आलेल्या अशा त्रुटी तातडीने दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला जाणवतो. यामध्ये प्रमुख समस्या होती ती जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाची. याच कारणासाठी नागरिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत होते व त्यांना रोखणेही नैतिक स्तरावर अडचणीचे ठरत होते. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घरपोच वस्तू वितरणाची यंत्रणा उभारून यावर तोडगा काढण्यात आला. आंबा वाहतुकीचा प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न झाले. भाजी व फळे विक्रीसाठी शाळेच्या मैदानांचा वापर करण्याचा प्रयोगही हाती घेण्यात आला. बेघर मजुरांच्या प्रश्नाने डोके वर काढल्यानंतर विविध संस्था व नागरिकांच्या मदतीने त्याचे भोजन व शाळा अधिग्रहित करून त्यांच्या निवासाचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्नही अंतिम टप्प्यात आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईत खंबीरपणे लढत असताना खाजगी क्षेत्रातील अनेक वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णसेवा बंद करून टीका ओढवून घेतली आहे. पोलीस मित्र म्हणून शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांना आदेश देण्यापासून त्यांच्या अन्य व्यवस्थेकडे शिक्षण विभागाने केलेले दुर्लक्ष समोर येत आहे. शाळात शिल्लक असलेल्या पोषण आहाराच्या धान्याच्या वितरणावरूनही मतभेद सुरू आहेत. 9वी पासून पुढील वर्गांच्या परीक्षेचा प्रश्न अधांतरीच आहे. कोरोनाशी लढाई लढण्यासाठी प्रशासन व नागरिक सर्व शक्ती वापरत आहेत. उपलब्ध साधनांनिशी ही लढाई सुरू आहे.
याच काळात अनेकांचे आर्थिक कंबरडे मात्र पुरते मोडून पडणार आहे. यातून काही मानसिक व भावनिक प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायांतील तोटा, विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यास, शेतकरी, उद्योजकांचे झालेले न मोजता येणारे नुकसान याची भरपाई करण्याचे फार मोठे आव्हान जिल्हावासियांसमोर उभे ठाकणार आहे. त्याच जोडीला आता स्वाईन फ्लूनेही जिल्हय़ात प्रवेश केल्याने दुसऱया लढाईसाठीही सज्जता ठेवण्याची गरज आहे. अर्थात संकटाला न घाबरणारा कोकणी माणूस या सर्व आघाडय़ांवरही मेरीटमध्येच पास होइल याबाबत कोणतीही शंका नको
विश्वेश जोशी








