आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षण संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार
खासगी शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या दहशतीमुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली होती. आता सुटीचा कालावधी 11 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी असल्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांच्या सुटीत 11 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या कालावधीत शिक्षकांनी कार्यालयीन कामे पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे तातडीने कामासंबंधी फोन आल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
काही खासगी शाळांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शुल्क भरणा करण्याची पालकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आल्याने शुल्क भरणा, नव्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱया शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना किवा पालकांना कोणत्याही सूचना दिल्या असतील तर त्या मागे घ्याव्यात. एखाद्या वेळेस शाळांनी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा शाळा व्यवस्थापन मंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील, अशा इशारा मंत्री सुरेशकुमार यांनी दिला आहे.









