प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना विजेचे बिल भरणे कठीण होत आहे. घराबाहेर पडणे अशक्मय असल्याने बिल कसे भरायचे, असा प्रश्न ग्राहकांसमोर होता. परंतु केंद्र सरकारने वीजबिल भारण्यासाठी तीन महिन्यांची सवलत दिली आहे. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
विजेचे बिल भरले नाही की वीज कंपन्यांकडून विजेचे कनेक्शन तोडले जाते. सध्या नागरिकांसाठी कठीण कालावधी असून त्यांना पैसेही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार वाढू नये, याकरिता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. संबंधित निर्णयाची प्रत्येक राज्य सरकारने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचे बिल भरण्यासाठी पुढील तीन महिन्यांची सवलत देण्यात आली आहे.
वीजबिल भरा ऑनलाईन
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हेस्कॉमने ऑनलाईन विजेचे बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना त्यांच्या बिलावरील क्रमांकानुसार हेस्कॉमच्या वेबसाईट तसेच पेटीएममधून बिल भरता येणार आहे. ग्राहकांना घर बसल्या बिल भरता यावे, यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे.