नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रसिद्ध बॉलिवुड गायिका कनिका कपूर कोरोनाग्रस्त झाली असून तिचा चौथा चाचणी अहवालही तिला कोरोनाची लागण झाल्याचे दाखविणारा आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. ती काही दिवसांपूर्वी लंडनहून भारतात आली होती. तिला विलगीकरण करण्याची सूचना विमानतळावरच देण्यात आली होती. मात्र ती धुडकावून ती नंतरच्या दोन तीन दिवसांमध्ये अनेक पाटर्य़ांमध्ये सामील झाली होती, असे सांगण्यात आले. या पाटर्य़ांमध्ये काही खासदारही समाविष्ट असल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कनिकाला नंतर ताप येऊ लागल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली. तिला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले तरी ती उपचारांना योग्य प्रतिसाद देत नाही, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.









