बेळगाव / प्रतिनिधी
प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शहराच्या चौका-चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस रात्रंदिवस नागरिकांवर नजर ठेवून आहेत. मात्र पोलिसांची खाण्यापिण्याविना हेळसांड होत आहे. अशा पोलिसांना समाजातून मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. शनिवारी उद्यमबागमधील श्रीमंत धनगर व पहिला क्रॉस भाग्यनगर येथील बाळाराम मळप्पगोळ यांनी शहरातील टिळकवाडी, कणबर्गी रोड, क्लब रोड आदी ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना पुलाव, बिस्किटे, चहा व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटताना दिसत आहे. अशावेळी यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत. शनिवारी ओमकार मुळे यांने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात कोरोना रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना थंड पेये, बिस्किट व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. याबरोबरच गणेशपूर गल्ली शहापूर येथील प्रवीण कोंपी व उदय कोंपी या बंधूनी उन्हाच्या झळा सोसत दिवसभर उन्हात असलेल्या पोलिसांना ताकाचे वितरण केले आहे. यावेळी त्यांनी गोवावेस व काकतीवेस येथील पोलिसांनाही ताक दिले.