प्रतिनिधी/ निपाणी
संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना या विषाणूने आता निपाणीच्या वेशीवर एंट्री केली आहे. भावनिक व व्यावहारिकदृष्टय़ा निपाणीच्या अगदी जवळ असलेल्या कोल्हापुरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्याने निपाणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आतापर्यंत थट्टा-मस्करीचा विषय बनलेल्या कोरोनाबाबत आता अधिकच गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट झाले असून नागरिकांनीही आवश्यक सुरक्षितता काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
जगभरात वाऱयाप्रमाणे कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. भारतातही या रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाऊन देशभरात करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात रुग्ण वाढत जात असताना नजीकच्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हय़ात एकही संशयित रुग्ण नसल्याने नागरिकांना दिलासा होता. मात्र गुरुवारी कोल्हापुरात मंगळवार पेठ व पेठ वडगाव परिसरात संशयित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकप्रकारे निपाणीच्या वेशीवरच हा कोरोना आल्याने शहर व परिसराने अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून निपाणीसह परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पोलिसांकडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया वाहनधारक व नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला जात आहे. असे असतानाही दुर्दैवाची व संतापजनक बाब म्हणजे अजूनही शहर तसेच ग्रामीण भागात रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. शहर व परिसराचा व्याप पाहता पोलीस संख्याबळ कमी असतानाही उपलब्ध बळाच्या जोरावर पोलिसांकडून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाईलाज म्हणून पोलिसांना कठोर व्हावे लागत आहे. असे असतानाही अद्याप अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
निपाणी परिसरात कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांबरोबरच नगरपालिका, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग डोळय़ात तेल घालून लक्ष देत आहे. जनजागृतीबरोबर अत्यावश्यक कामे हाती घेतली जात आहेत. अशावेळी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. घराबाहेर न पडता केवळ घरात बसणेदेखील नागरिकांना होत नसेल तर अशा लोकांचे करायचे तरी काय? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निपाणी भागात होणार नाही यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी व प्रशासनास सहकार्य करत घराबाहेर पडणे टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
लाठीचा वापर कराच..!
दरम्यान कोल्हापुरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने निपाणी भागात आता लॉकडाऊनची अधिकच काटेकोर अंमलबजावणी करणे हे प्रशासन व नागरिकांचेही कर्तव्य बनले आहे. असे असताना काहींकडून रस्त्यावर फिरून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यातच गेल्या दोन दिवसात निपाणी शहरात रस्त्यावर नागरिकांची अधिकच वर्दळ पाहायला मिळत आहे. ग्रुपने जमणे, गाडीवरून विनाकारण फिरणे यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीविरोधात पोलिसांनी नक्कीच काठी हातात घ्यावी, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले जात आहे.
निपाणीत 650 हून अधिक जणांची तपासणाr
देशभरात होत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सतर्क झालेल्या आरोग्य खात्याने बाहेरुन आलेल्या तसेच परराज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या व सध्या घरी आलेल्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. निपाणीत महात्मा गांधी रुग्णालयात गेल्या 6 दिवसात 650 हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. शुक्रवारपासून परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही तपासणीची सोय करण्यात आली आहे. तरी बाहेरुन आलेल्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.