ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशभरात फैलावत चाललेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यम प्रमुखांशी संवाद साधला. आज प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना देशात कोरोनाचा विळखा वाढत असताना माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सोमवारीच पंतप्रधानांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रमुखांशी चर्चा केली होती.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या काळात देशाला माध्यमांची गरज
आहे. संकटांच्या स्थितीत जनतेला योग्य माहिती देण्याची गरज आहे. त्यात
वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यमांनी लोकांपर्यंत
अचूक माहिती पोहोचवण्याचे काम सुरूच ठेवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी
केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित
करणार आहेत. जागतिक महामारी असणाऱ्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी
काही महत्त्वाच्या बाबींची चर्चा करण्यासाठी आज, २४ मार्चला रात्री ८ वाजता
देशाला संबोधित करणार आहेत, असे ट्वीट मोदींनी केले आहे.









