प्रतिनिधी/ निपाणी
कोराना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्याला बेळगाव जिल्हय़ात सर्वत्र 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. जिल्हय़ातील दुसऱया क्रमांकाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया निपाणीत सर्वच ठिकाणी स्मशानशांतता अनुभवायला मिळाली. तसेच चिकोडी, हुक्केरी, अथणी, कागवाड, रायबाग या तालुक्यांमध्येही शहरांबरोबरच गावोगावच्या गल्ल्याही सुनसान असल्याचे दिसून आले. शहरासह ग्रामीण भाग पूर्णपणे ठप्प होण्याची जिल्हय़ातील ही पहिलीच वेळ ठरली. सायंकाळी 5 वाजता सर्वत्र झालेला टाळय़ांचा कडकडाट व घंटानाद कोरोनाविरोधातील लढाईला उर्जा देणारा ठरला.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासूनच सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तत्पूर्वी 31 मार्चपर्यंत सर्व हॉटेल, बार तसेच चिकन, मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आल्याने शनिवारी सायंकाळी मटण, चिकन खरेदीसाठी निपाणीत तोबा गर्दी दिसून आली. त्याचवेळी सर्वत्र दुकानांमध्ये मटणाचा साठा संपल्याचे पहायला मिळाले. शहर व परिसरात निरोगी आरोग्यासाठी फिरायला जाणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र रविवारी पहाटे बहुतांशी लोकांनी फिरायला जाणेही टाळले. त्यामुळे रविवारची पहाट ही निरव शांतता घेऊनच झाल्याचे दिसले.
शहरातील बसस्थानक, संभाजीराजे चौक, जुना पी. बी. रोड, मुरगूड रोड, चिकोडी रोड, बेळगाव नाका, नेहरु चौक, अशोकनगर आदी सर्वच ठिकाणी पडलेल्या टाचणीचा आवाज यावा इतकी शांतता पहायला मिळाली. अत्यावश्यक सेवांमध्ये गणली जाणारी औषध दुकानेही निपाणीत बंद होती. ग्रामीण भागातही सकाळी 7 पूर्वीच सर्व कामे आटोपून नागरिकांनी घरी राहणे पसंत केले.
‘त्या’ वाहनधारकांना पोलिसांचा ‘प्रसाद’
दरम्यान संचारबंदीमुळे कर्नाटक-महाराष्ट्र वाहतूक सेवा ठप्प होती. अशातच शनिवारी रात्री कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया तीन ट्रव्हल्स कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांनी अडविल्या. तसेच मुरगूड रोडवरुन निपाणी पोलिसांना चकवा देऊन येण्याचा प्रयत्न करणाऱया ट्रव्हल चालकास तवंदी घाटात अडवून पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर एखादा वाहनधारक दिसल्यास त्याची कसून चौकशी केली जात होती.
बारावीचा शेवटचा पेपरही पुढे ढकलला…
कोरोनाची धास्ती वाढत असतानाच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहावी पाठोपाठ बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर पुढे ढकलला आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील बारावी परीक्षा 4 मार्चपासून सुरू झाली होती. त्यानुसार सर्व पेपर सुरळीतपणे पार पडले होते. मात्र सोमवार दि. 23 रोजी होणारा इंग्रजी विषयाचा शेवटचा पेपर कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे 31 मार्च पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मिशन एचएससी कोरोनाच्या सावटामुळे अपूर्ण राहणार आहे.
दहावी परीक्षा लांबणीवर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या विळख्यातून बचाव करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहावी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षाच्या दहावी परीक्षेला 27 मार्चपासून प्रारंभ होणार होता. मात्र, कोरोनाची वाढती तीव्रता विचारात घेऊन मंडळातर्फे राज्यातील दहावीची परीक्षा लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.