बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘जनता स्वयंसंचारबदी’मध्ये बेळगावकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सार्वजनिक लढा उभारला आहे. रविवारी बेळगाव शहर व तालुक्मयात पूर्णपणे व्यवहार ठप्प झाले होते. इतिहासात प्रथमच अशाप्रकारे शहर स्वयंस्फूर्तीने बंद होते. एरव्ही गजबजणारे रस्ते रविवारी मात्र सामसूम असल्याचे दिसून आले. नागरिकांनी आपले व्यवसाय बंद करून घरीच राहून या संचारबंदीमध्ये सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण शहरात शांतता व शुकशुकाट पसरला होता.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, हॉटेल, वाहतुकीची साधने बंद होती. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत जनतेने संचारबंदी पाळली. कुटुंबीयांसोबत सर्वांनी रविवारचा संपूर्ण दिवस घालविला. कोणी खमंग पदार्थांचा बेत आखला होता तर काहींनी मांसाहारावर ताव मारला. यासाठी शनिवारी रात्रीच खरेदी केली होती. संपूर्ण दिवस टीव्ही व मोबाईल पाहण्यात अनेकांनी रविवारचा दिवस घालवला.
रविवारी पहाटेपासूनच या संचारबंदीचा परिणाम दिसून आला. वृत्तपत्र विपेत्यांनीही पहाटेच वृत्तपत्र घरोघरी टाकण्यास सुरुवात केली. घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहोचविणारेदेखील पहाटेपासून कामाला लागले होते. त्यामुळे सकाळी 7 पूर्वीच या विपेत्यांनी आपली कामे आटोपली. नागरिकच नसल्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. नेहमी गर्दीने फुलणारे धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, एसपीएम रोड, नेहरूनगर, गांधीनगर, अनगोळ रोड, वडगाव रोड, आरपीडी चौक, काँग्रेस रोड या भागात रविवारी मात्र चिटपाखरूदेखील दिसून येत नव्हते.
हॉटेल-रेस्टॉरंट बंद
हॉटेल मालक असोसिएशनने केलेल्या आवाहनानुसार शहरातील सर्व लहान- मोठय़ा हॉटेल चालकांनी आपली हॉटेल्स रविवारी दिवसभर बंद ठेवली होती. एरव्ही कितीही शहर बंद असले तरी हॉटेल्स सुरू ठेवण्यात येत होती. परंतु या वेळी पहिल्यांदाच शहरातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट्स बंद होती. यामुळे कामानिमित्त बेळगावमध्ये असलेल्या नागरिकांना याचा फटका बसला. त्यांना आपल्या जेवणाची सोय इतरत्र करावी लागली.
भाजी मार्केट पूर्णपणे ठप्प
बेळगावचे भाजी मार्केट रविवारी पूर्णपणे ठप्प असलेले चित्र पाहायला मिळाले. नरगुंदकर भावे चौक, शनिवार खूट, काकतीवेस रोड, आझमनगर रोड, शहापूर रोड या भागात करण्यात येणारी भाजीची विक्री रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. रविवारी भाजीची विक्री होणार नसल्याने विपेत्यांनी खरेदी केली नव्हती. नागरिकांनी आपल्याला लागणारा भाजीपाला शनिवारी खरेदी केला होता.
रिक्षा-मॅक्सीकॅब पूर्णपणे बंद
कोरोनाच्या धास्तीने व सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी रुग्णालयांच्या शेजारी रुग्णांची ने-आण करण्यासाठी रिक्षा दिसत होत्या. इतर ठिकाणी मात्र शहरात कुठेही रिक्षा दिसून आल्या नाहीत. मॅक्सीकॅबदेखील बंद ठेवून सर्व चालकांनी घरीच राहणे पसंद केले. यामुळे एरव्ही रिक्षांची असणारी वर्दळ रविवारी पूर्णपणे बंद होती.
अत्यावश्यक सेवा सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील संपूर्ण जनतेने स्वयंस्फूर्तीने संचारबंदीमध्ये सहभाग घेतला. या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शहर व तालुक्मयातील पेट्रोलपंप सुरू होते. परंतु पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी ग्राहकच नसल्याने काहीच कर्मचारी पंपांवर दिसत होते. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी हॉस्पिटल व मेडिकल सुरू ठेवण्यात आली होती.
खासबाग आठवडी बाजार बंद
प्रत्येक रविवारी खासबाग येथील आठवडी बाजार भरविला जातो. गरिबांचा बाजार अशी ओळख असणाऱया या बाजारामध्ये मोठी गर्दी होते. या बाजारामध्ये गृहोपयोगी साहित्याबरोबरच फळे, भाजीपाला मिळत असल्यामुळे आसपासच्या उपनगरांमधून नागरिक खरेदीसाठी येत असतात. परंतु रविवारी हा बाजार बंद ठेवण्यात आला.
संचारबंदीला काही जणांकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न
संपूर्ण देशभर नागरिक गांभीर्याने जनता संचारबंदीमध्ये सहभागी झाले असताना बेळगावमधील काही जणांकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न केला गेला. गुड्सशेड रोड एका अपार्टमेंटच्या खाली अनेक नागरिक एकत्र येऊन क्रिकेट खेळताना दिसून आले. काही जणांनी शिवारांमध्ये जाऊन पाटर्य़ा केल्याचे दिसून आले. सायंकाळी घंटानाद करतेवेळी काही विघ्नसंतोषींकडून बॉम्ब व फटाके लावण्यात आले. यामुळे या लोकांना कोरोनाचे गांभीर्य नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते.
बालचमू पहिल्यांदाच घरात
सुटी म्हटली की बालचमुंचा आनंद गगनात मावणारा नसतो. संपूर्ण सुटीचा दिवस इकडे तिकडे फिरून खेळायला जाऊन काढला जातो. काही युवक पोहण्याचा आनंद घेतात. परंतु रविवारी पहिल्यांदाच बालचमुने घरामध्ये सुटी घालविली. शहराच्या कुठल्याही भागात रस्त्यावर लहान मुले खेळताना दिसून आली नाहीत. त्यामुळे लहान मुलांमध्येही कोरोनाविषयीचे गांभीर्य दिसून आले.
पोलिसांकडून नागरिकांना सूचना
रविवारच्या संचारबंदीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येत होती. शहराच्या विविध भागात पोलीस गस्त घालून परिस्थितीची पाहणी करीत होते. रस्त्यांवर फिरणाऱया नागरिकांना पोलीस सूचना करीत होते. न ऐकणाऱया तरुणांना पोलिसांचा प्रसाद खावा लागत होता. मात्र चौकाचौकात दिसणारे पोलीस रविवारी दिसून आले नाहीत.
चिकन विक्रीचा प्रयत्न फसला
सरकार, विविध संघटना तसेच नागरिकांनी रविवारी पूर्णपणे संचारबंदी पाळण्याचे आवाहन करूनही खासबाग परिसरात चिकन दुकाने रविवारी दुपारपर्यंत सुरू करण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चिकन-मटणची विक्री जोरात सुरू असल्यामुळे या विपेत्यांनी रविवारी सकाळीही दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी शनिवारी रात्रीच चिकन खरेदी केल्यामुळे दुकानाकडे ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव विपेत्याला काही वेळाने दुकान बंद करावे लागले. परंतु या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.