नवी दिल्ली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. देशातील अन्यधान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मालवाहतूक मात्र सुरू राहणार आहे. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आणि महानगरांमधून गावी जाणाऱया लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक काढूनच सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि शहरांतर्गत रेल्वे (प्रिमियम टेन्ससह) आणि सर्व प्रवासी रेल्वे 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. पूर्वनियोजनानुसार रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्या मूळ स्थानावरून निघालेल्या मेल/एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर रेल्वे आपल्या अखेरच्या स्थानकापर्यंत धावू शकतील. पण त्यानंतर त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईसह देशातील सर्व उपनगरीय लोकलही बंद
मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत 31 मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी मुंबईची लोकल सेवा रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चच्या मध्य रात्रीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. रविवारी मध्यरात्रीपासून देशभरातील उपनगरीय रेल्वे सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल इतिहासात पहिल्यांदाच 9 दिवसांसाठी बंद राहणार आहे. याशिवाय कोलकातामधील लोकल, मेट्रो 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे.