गर्दी टाळण्यावर विशेष भर देण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. सध्या तरी गर्दी टाळणे आणि गर्दीत मिसळण्यापासून स्वतःला दूर ठेवणे हेच प्रभावी उपाय असल्याचे जनतेला पटवून द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. रविवारी स्वयंसंचारबंदीचा प्रस्ताव आपण याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ठेवलेला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कोरोनाचा प्रसार थांबविणे हे रूग्णांवर उपचार करण्याइतकेच महत्त्वाचे कार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून लोकांनी शरीरस्पर्श टाळण्यावर भर दिला पाहिजे. अद्यापही या विषाणूवर खात्रीचे औषध नसल्याने काळजी घेणे हाच मार्ग आहे. सर्व मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यापारी संस्थांच्या संचालकांशी संपर्क करावा आणि त्यांना काळाबाजार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
कायदेशीर उपाय करा
सध्याच्या परिस्थितीत अन्नधान्य व औषधे यांची साठेबाजी होऊ न देणे हे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी व्यापारीवर्गावर प्रशासनाने नजर ठेवली पाहिजे. साठेबाजी न करण्याचा आग्रह त्यांना केला पाहिजे. यातूनही जे जुमानणार नाहीत त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. प्रारंभी त्यांना प्रशासनाशी सहकार्य करण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सामोपचाराने करण्यात यावा. नंतर आवश्यकता भासल्यास कायद्याचे अस्त्र वापरावे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
घबराटीपासून मुक्तता आवश्यक
विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असली तरी प्रत्येकाने स्वतःला घबराटीपासून मुक्त ठेवणे आवश्यक आहे. घाबरून जाण्यापेक्षा तज्ञांच्या सूचनांचे पालन करणे आणि स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे उपाय आहेत. सावधानता, दक्षता आणि सजगता यामुळेच आपण बचावू शकतो, असेही मत त्यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांकडून चाचणी सुविधांची मागणी
जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे हा प्राथमिक मार्ग आहे. यासाठी चाचणी सामग्री अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. सध्या देशात 80 हून अधिक ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. तथापि, ती अपुरी ठरण्याची शक्मयता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी चाचणी सुविधा उपलब्ध केल्यास या साथीच्या विस्ताराचा आवाका समजू शकेल आणि त्याप्रमाणे उपाययोजना करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले. त्या दिशेने पावले टाकण्याचे आश्वासन मोदींनी दिले.