मध्यप्रदेशातील राजकीय नाटय़ संपुष्टात : सभागृहामध्ये शक्तीपरीक्षण टाळले
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाटय़ाची अखेर मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याने सांगता झाली आहे. राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे कमलनाथ यांनी दुपारी राजीनामा सोपवला आहे. शुक्रवारीच सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत होती.
कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपने केल्याचा आरोप केला. ज्यांच्या मदतीने हे षड्यंत्र घडवून आणले त्या राजा-महाराजांना जनता माफ करणार नाही, अशी टिप्पणीही केली. तर बंडखोर आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी स्वीकारले आहेत.
हा मध्यप्रदेशमधील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया बंडखोरी करुन भाजपमध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांनी व्यक्त केली आहे. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम असावे, असे आपले कायम मत आहे. परंतु मध्यप्रदेशातील सरकार या मार्गावरुन भरकटले होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सत्याचा विजय झाला असल्याचेही ते म्हणाले. तर सिंदिया समर्थक आमदारांनी महाराजांच्या अवमानाचा बदला घेतल्याचे म्हटले आहे.
मध्यप्रदेश विधानसभेचे एकूण 230 सदस्य असून यातील 24 जागा रिक्त आहेत. 206 सदस्यसंख्येमुळे बहुमतासाठी काँग्रेसला 104 आमदारांच्या समर्थनाची गरज होती. तथापि 22 जणांनी राजीनामे दिल्याने त्यांचे संख्याबळ 92 वर आले होते. तर त्यांचे समर्थक सपा, बसपा व अपक्ष धरुन 99 होत होते. दुसरीकडे भाजपकडे त्यांचेच 107 सदस्य आहेत.
सिंदिया यांनी बंडखोरीचा निर्णय घेतल्यानंतरच काँग्रेसचे कमलनाथ सरकार अडचणीत आले होते. सिंदिया यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर 11 मार्च रोजी 22 बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते. यातील 6 राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी त्वरीत स्वीकारले व मंजुर केले. तर उर्वरितांचे राजीनामे गुरुवारी रात्री उशीरा मंजुर केले. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले. हे सर्व आमदार सध्या बेंगळूरमध्ये आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना कमलनाथ यांनी भाजपवर सरकार पाडल्याचा आरोप केला आहे. विधानसभेमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. 17 डिसेंबर 2018 रोजी शपथ घेतली. मात्र आज 15 महिन्यानंतर आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे. भाजपने सत्तेसाठी आमिष दाखवून सदस्यांना फोडल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्या दिवसापासूनच भाजपचे षड्यंत्र सुरु होते. त्यांनी 22 सदस्यांना डांबून ठेवल्याने राजीनामा देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.