विविध सेलेब्ज रिऍलिटी शोचे परिक्षक म्हणूनही काम बघतात. परिक्षक म्हणून काम करण्याच्या नादात हे सेलेब्ज काही वेळा चुकीचं वागतात, चुकीचं बोलून जातात. मग त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.
परिक्षक म्हणून काम करणारे सेलिब्रिटी बरेचदा तारतम्य सोडून वागतात. रिऍलिटी शोमध्ये सहभागी होणार्या स्पर्धकांबाबत अपशब्द काढतात, चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देतात, अर्थहीन वक्तव्य करतात. हे सगळं प्रेक्षकांसमोर घडतं आणि सेलिब्रिटी परिक्षकांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. नेहा धुपियावर सध्या बरीच टीका होत आहे. नेहा सध्या ‘रोडिज रेव्हल्यूशन’ची गँग लीडर आहे. ‘रोडिज’ हा तरुणाईशी संबंधित रिऍलिटी शो आहे. या शोमध्ये नेहाने मुलीच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन केलं. याच कारणामुळे ती ट्रोल होत आहे. ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार्या सलमान खानवरही बरेचदा टीका झाली. ‘बिग बॉस’च्या तेराव्या हंगामात सलमानने स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. टीव्हीसारख्या माध्यमावर अशा पद्धतीने कोणाचं वैयक्तिक आयुष्य चव्हाटय़ावर आणणं योग्य नसल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं. याच कारणामुळे सलमानवर बरीच टीका झाली. नेहा कक्कर ‘इंडियन आयडॉल’ची परिक्षक म्हणून काम बघते. या कार्यक्रमात सहभागी होणार्या स्पर्धकांचा संघर्ष ऐकून तिला बरेचदा रडू फुटतं. ती सगळ्यांसमोर अश्रू ढाळते. भावनिक होते. यामुळे प्रेक्षकांनी तिला रडूबाई असं नाव दिलं आहे. आपण भावनिक असल्याचं सांगत नेहानेही ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. करणने जोहर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमात हार्दिक पंडय़ा आणि के. एल. राहुल हे क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यावेळी या दोघांनी महिलांसंदर्भात चुकीचं वक्तव्य केलं. करणनेही यावर हास्यविनोद केले. याच कारणामुळे करणवर बरीच टीका झाली. शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’ या रिऍलिटी शोची परिक्षक होती. त्यावेळी स्पर्धकांचं नृत्य बघितल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. या कारणामुळे तिच्यावर बरीच टीका झाली.









